राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील शिवरामनगर येथील त्यांच्या मुक्ताई बंगल्यात ही घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी बंगल्यातील रोकड रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा शिवरामनगर येथील बंगला बंद होता. सकाळी (दि. २८) त्यांच्या कर्मचाऱ्याने नेहमीप्रमाणे बंगल्याची पाहणी केली असता, घराचे कुलूप तुटलेले आणि आतले सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तत्काळ खडसे यांना फोन करून माहिती दिली. घटनेची खबर मिळताच खडसे यांनी पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
काय चोरीला गेले?
चोरट्यांनी सोमवारी रात्री (दि. २७) बंगल्यातील सर्व खोल्यांची कुलपे तोडून चोरी केली. एकनाथ खडसे यांच्या मते, त्यांच्या खोलीत सुमारे ३५ हजार रुपये रोकड आणि ४ सोन्याच्या अंगठ्या होत्या, ज्या चोरीस गेल्या आहेत. तसेच घराच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या नातेवाईकांचे ५ तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केले आहे. एकूण ६ ते ७ तोळे सोनं आणि रोकड असा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, रात्री घरफोडी झालेली आहे. बंगल्यातील सर्व रूमचे कुलुपं तोडलेली आहेत. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरी करण्यात आली. पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडे असे प्रकार वाढले आहेत. दोन नंबरचे धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांवर थोडी टीका केली तरी स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. घटनेचे गांभीर्य ना पोलिसांना, ना सरकारला आहे.
याआधी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या सून, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘रक्षा फ्युअल’ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता. ९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या या दरोड्यात आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला.