महाराष्ट्र

‘बीएमसी’च्या तिजोरीत यांचा जीव अडकलाय; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“मुंबई महापालिका यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटते. अशा भावनेने हे ३० वर्षे काम करत आहेत. मुंबई खतरे में है, मुंबई महाराष्ट्रपासून तोडली जाईल, अशा आरोळ्या हे निवडणूक जवळ येताच ठोकतील. खरे तर ‘मुंबई खतरे’मध्ये नसून तेच खतऱ्यात आहेत. त्यांचे अर्थकारण, राजकारण धोक्यात येणार असल्याने यांचा जीव ‘बीएमसी’च्या तिजोरीत अडकला आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

Swapnil S

मुंबई : “मुंबई महापालिका यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटते. अशा भावनेने हे ३० वर्षे काम करत आहेत. मुंबई खतरे में है, मुंबई महाराष्ट्रपासून तोडली जाईल, अशा आरोळ्या हे निवडणूक जवळ येताच ठोकतील. खरे तर ‘मुंबई खतरे’मध्ये नसून तेच खतऱ्यात आहेत. त्यांचे अर्थकारण, राजकारण धोक्यात येणार असल्याने यांचा जीव ‘बीएमसी’च्या तिजोरीत अडकला आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी ‘एनएससीआय डोम’ येथे साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, “आपल्या लाडक्या शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. दुसरा सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांचा आहे. धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडे आहे. गेल्या ५९ वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. बाळासाहेबांचे तेजस्वी नेतृत्व आणि शिवसैनिकांचे प्रेम यामुळे शिवसेना वाढली. शिवसेना इतर राज्यांमध्ये वाढत आहे. बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, त्यामुळे आपली विजयी घोडदौड सुरू आहे.”

२०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेने ८० जागा लढवत ६० जागा जिंकल्या. तर उबाठाने ८५ जागा लढवत अवघ्या २० जागा जिंकल्या. त्यांना एक तृतीयांश मतेही मिळाली नाहीत. ज्या जागा जिंकल्या त्या काँग्रेसच्या जीवावर मिळाल्याची टीका करत आपल्याकडे असलेला आत्मविश्वास यशाकडे घेऊन जातोय तर त्यांचा अहंकार विनाशाकडे घेऊन जातोय,” अशी टीकाही त्यांनी केली.

“अख्खा महाराष्ट्र आपला आहे. निवडणूक आली की यांना मराठी माणूस आठवतो. या निवडणुकीतही मतदार वाऱ्याला फिरू देणार नाहीत. आता मराठी माणूस आठवेल. खोटे गळे काढतील. मराठी माणसांसाठी काय केले याचा हिशोब द्या. मराठी माणूस बाहेर गेला, हे यांचे पाप आहे,” असा आरोपही शिंदे यांनी केला.

“हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीत, बॉम्बस्फोटातील आरोपीला घेऊन फिरता, आरएसएसला शिव्या देता, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकताना तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते,” असा सवालही शिंदे यांनी केला. “हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. कधीही मराठीला अंतर देणार नाही, एवढा शब्द देण्यासाठी मी आलोय,” असे ते म्हणाले.

बाळासाहेबांचे स्वप्न मोदी, शहांनी पूर्ण केले

“काश्मीरचे ३७० कलम हटवणे आणि राममंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न मोदी आणि शहा यांनी पूर्ण केले. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवले त्यांच्या नावाने ओव्या गाणार. भारताने पराक्रम गाजवल्यावर बाळासाहेब असते तर शाबासकी दिली असती. पण विरोधक भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेत राहिले. हा एकप्रकारचा देशद्रोह आहे. विरोधक पाकिस्तानचे एजंट आहेत. भारताविरोधात बोलून राहुल गांधी पाकिस्तानमध्ये हिरो झाले,” असा हल्लाबोलही त्यांनी केला.

“शेतकरी ‘ये रे ये रे पावसा’ म्हणतो आणि उबाठा ‘ये रे ये रे पैसा’ म्हणतो. तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे. भ्रष्टाचार, लाचारी, विश्वासघात हा यांचा मूलमंत्र आहे. कचरा, डांबर, बॉडी बॅगमध्ये पैसे खातात. जनतेचा कितीही पैसा खाल्ला तरी यांचे पोट भरत नाही. किती मोठे पोट आहे, असा सवाल करत मिठी नदीच्या गाळामध्ये पैसे खाणारे मगरमिठीतून सुटणार नाही, हे लक्षात ठेवावे. दिनो मोरियाची चौकशी सुरू असून त्याने तोंड उघडल्यास किती लोकांचा मोरया होईल,” असा इशाराही त्यांनी दिला. ‘लाडकी सून अभियान’ आनंद दिघे यांच्या आश्रमातून सुरू होणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.

यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात पाठविण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्याशी लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी संवाद साधला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video