संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कामगिरी सुधारा, अन्यथा बाजूला व्हा! निष्क्रिय मंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

जनतेची कामे करण्याला प्राधान्य देण्याऐवजी काही मंत्री वैयक्तिक हितसंबंध जोपसण्यात मग्न आहेत.

Swapnil S

मुंबई/प्रतिनिधी

जनतेची कामे करण्याला प्राधान्य देण्याऐवजी काही मंत्री वैयक्तिक हितसंबंध जोपसण्यात मग्न आहेत. अशा मंत्र्यांनी लोकाभिमुख होऊन आपल्या कामगिरीत सुधारणा करावी, अन्यथा अशांना बाजूला करून पक्षकार्यासाठी मोकळे केले जाईल, अशा शब्दात एकनाथ मंगळवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षातील निष्क्रिय मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना कामात सुधारणा करण्यासाठी शिंदे यांनी काही महिन्यांची मुदत दिल्याचे समजते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला शिंदे यांचे ९ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांच्या कामगिरीची झाडाझडती घेताना शिंदे यांनी मंत्र्यांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याबाबत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

अनेक मंत्र्यांनी स्वतःला आपापल्या मतदारसंघापुरती बांधून घेतले आहे. मंत्री मतदारसंघाच्या पलीकडे बघायला तयार नाहीत. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे दौरे, शासकीय बैठका होत नाहीत. पालकमंत्री जिल्ह्यातील कार्यकर्त्याना भेटत नाहीत. शिवाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. विदर्भातील एक मंत्री तर 'कमळ' च्या वाढीसाठी हातभार लावत आहे. काही मंत्र्यांच्या कमिशनखोरीबद्दल तक्रारी आल्या आहेत, अशा शब्दात शिंदे यांनी मंत्र्यांना फैलावर घेतल्याचे सांगण्यात आले.

वारंवार सूचना करूनही मंत्र्यांच्या कारभारात सुधारणा होणार नसेल तर अशांना पक्ष कार्यासाठी जुंपण्यात येईल. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा सूतोवाच शिंदे यांनी बैठकीत केले. शासकीय बैठकांचा वेळ सोडून मंत्र्यांनी आपला उर्वरित वेळ जनतेच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी द्यावा. मंत्र्यांनी शनिवार, रविवार संघटनात्मक दौरे करावेत. दौऱ्याचा तपशील, अहवाल पक्षाला सादर करावा, अशी सूचनाही शिंदे यांनी मंत्र्यांना केली. यावेळी राज्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा मुद्दा मांडल्याचे कळते. या बैठकीला उदय सामंत, दादाजी भुसे, शंभूराज देसाई, संजय राठोड, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, योगेश कदम आणि आशिष जयस्वाल उपस्थित होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कठोर कारवाई नको! दिल्ली आंदोलनप्रकरणी 'सर्वोच्च' दिलासा; १८ वर्षांखालील मुलांची तत्काळ सुटका करण्याचे निर्देश

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक

Mumbai : मेटा आणि गुगलविरुद्ध गडकरींचा ११ कोटींचा दावा

गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Mumbai : पाच 'क्लब'चे परवाने रद्द; CCI, MIG यांच्यावर कारवाई, तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच