लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओने लोकांची मनं हेलावली आहेत. या व्हिडिओमध्ये शेतकरी अंबादास पवार यांनी बैलजोडीप्रमाणे स्वतः खांद्यावर जू घेत नांगर ओढताना दिसत आहेत, तर त्यांची पत्नी मुक्ताबाई नांगर हाताळताना दिसत आहे. आर्थिक अडचणींमुळे आणि कोणतीही यंत्रसामग्री किंवा बैल उपलब्ध नसल्याने या वृद्ध दाम्पत्याला अशी जीवघेणी मशागत करावी लागत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूद याने मदतीचा हात पुढे केला. त्याच्या मदतीनंतर आता प्रशासनालाही जाग आली आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडतोळी गावात अंबादास पवार राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव मुक्ताबाई पवार आहे. त्यांचा मुलगा शहरात मजुरी करतो. तर, मुलाची पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले हे अंबादास पवार यांच्या सोबत राहतात. पवार यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेतीची मशागत करण्यासाठी त्यांच्याकडे बैल, यंत्रसामग्री आणि पैसेही नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे या विचाराने अंबादास पवार यांनी जू खांद्यावर घेऊन पत्नीच्या मदतीने शेत नांगरण्यास सुरुवात केली. हे दृश्य कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केले आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओ व्हायरल होताच सोनू सूदचा प्रतिसाद -
अभिनेता सोनू सूद हा नेहमीच गरजूंना मदत करताना दिसतो. या सेवाभावी वृत्तीनेच सोनू सूदने या वृद्ध दाम्पत्यांना मदत करण्याची तयारी दाखवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सोनू सूदने ‘X’वरून भावनिक प्रतिसाद देत म्हटले, "कृपया आपला नंबर पाठवा, मी बैल पाठवतो.'' सूदच्या या संवेदनशील प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर एका युजरने या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हंटले, की ''भाऊ ट्रॅक्टरच पाठवा, या वयात बैल कोण चालवेल?'' यावर सोनू सूद याने ''आपल्या शेतकरी भावाला ट्रॅक्टर चालवता येत नाही, त्यामुळे बैलच योग्य राहील'' असे उत्तर दिले आहे.
कृषिमंत्र्यांचा फोनवर संवाद -
या प्रकरणाची दखल घेऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून, पवार कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पाटील यांनी अंबादास पवार यांना थेट फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.
प्रशासनाला आली जाग -
सोनू सूदच्या मदतीनंतर प्रशासनही अंबादास पवार यांच्या मदतीसाठी सक्रिय झाले आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी संबंधित दाम्पत्याची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, ''अंबादास पवार यांच्याकडे सुमारे चार बिघे कोरडवाहू जमीन आहे. सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने ते संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत. त्यांच्याकडे ना बैल आहेत, ना कुठलीही यंत्रसामग्री. सरकारच्या नियमानुसार पाच बिघांपेक्षा कमी जमीनधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि १.२५ लाख रुपये इतक्या अनुदानाची मदत दिली जाते. त्या योजनेद्वारे अंबादास पवार यांनाही मदत मिळेल. त्यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर शासनाच्या योजनेंतर्गत त्यांना ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि १.२५ लाख रुपये इतक्या अनुदानाची मदत मिळणार आहे.''