महाराष्ट्र

‘अतिक्रमणमुक्त विशाळगड’ लढ्याला हिंसक वळण; जमावाकडून तोडफोड, दगडफेक

‘अतिक्रमणमुक्त विशाळगड’ लढ्याला रविवारी हिंसक वळण लागले. जमलेल्या जमावाकडून वाहनासह घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसेच दगडफेक करीत जमावाने एका घराला आग लावण्याचा प्रकारदेखील घडला आहे. या

Swapnil S

कोल्हापूर : ‘अतिक्रमणमुक्त विशाळगड’ लढ्याला रविवारी हिंसक वळण लागले. जमलेल्या जमावाकडून वाहनासह घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसेच दगडफेक करीत जमावाने एका घराला आग लावण्याचा प्रकारदेखील घडला आहे. या प्रकारामुळे विशाळगडसह नजीकच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगडावरील अनधिकृत बांधकामविरोधात शिवप्रेमी व नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. यात छत्रपती संभाजीराजे यांनी दिनांक १४ जुलै रोजी अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा येथून हजारोच्या संख्येने शिवप्रेमी रविवारी विशाळगडाकडे रवाना झाले.

पहाटे पाच वाजल्यापासून शिवप्रेमी जमा होण्यास सुरुवात झाली. गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा असल्याने जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी गडावर जाऊ दिले नाही. काही वेळाने जमाव आक्रमक झाला व विशाळगडापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुसलमान वाडी येथे येऊन जमावाने दुचाकी व चारचाकी गाड्यांसह घरांना आपले लक्ष्य बनवले. यावेळी जमावाने तुफान दगडफेक केली. यामध्ये दुचाकींसह चारचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर घरांच्या काचा फोडून जमावाने एक घर पेटवले. मुसळधार पाऊस सुरू असतानासुद्धा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराने पेट घेतला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

शिवप्रेमींची घोषणाबाजी

दरम्यान, काही वेळानंतर छत्रपती संभाजीराजे यांचे आगमन झाल्यानंतर जमाव परत गडाकडे चाल करून गेला. भरपावसात ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त करा’ अशा घोषणा देत जमाव गडाच्या पायथ्याशी जमा झाला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, शाहूवाडी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण हे उपस्थित होते. गडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

वड्याचे तेल वांग्यावर

विशाळगड अतिक्रमणाच्या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका ज्यांचा अतिक्रमणाशी काहीच संबंध नाही, अशा गजापूरपैकी मुसलमानवाडी येथील ग्रामस्थांना बसला. गडापासून पूर्वेला अडीच किलोमीटर अंतरावर मुसलमानवाडी आहे. खरे पाहिले तर या वस्तीतील लोकांचाही गडावरील अनधिकृत अतिक्रमणाला विरोध होता. गडावरील स्वच्छता, दुर्गंधी आणि बेकायदेशीर अतिक्रमणामुळे गडाचे पावित्र्य जपले जात नसल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांतून केल्या जात होत्या. ऐतिहासिक गड आहे म्हणून आमची रोजीरोटी चालते, घरसंसार चालतो. त्यामुळे गड वाचवायलाच हवा, असे येथील रहिवाशांचे मत होते. मात्र, रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ अशी परिस्थिती निर्माण झाली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video