महाराष्ट्र

'सरसकट मराठी माणसाला बोललेच नाहीत'; निशिकांत दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची सारवासारव

मुंबईत सुरू असलेल्या भाषिक वादात झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) वादग्रस्त वक्तव्य करत संपूर्ण मराठी समाजाला डिवचलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ' दुबे मराठी माणसाला सरसकट उद्देशून नाही, तर संघटनेच्या संदर्भात बोलले आहे,' असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत सुरू असलेल्या भाषिक वादात झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) वादग्रस्त वक्तव्य करत संपूर्ण मराठी समाजाला डिवचलं. त्यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ' दुबे मराठी माणसाला सरसकट उद्देशून नाही, तर संघटनेच्या संदर्भात बोलले आहे,' असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ''विधीमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ''निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोललेत. मराठी माणसाला त्यांनी सरसकट म्हंटलेलं नाही. तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये. कारण त्याचे जे अर्थ निघतात, ते लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात.''

मराठ्यांच्या शौर्याची आठवण -

यावेळी इतिहासातील मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून देताना फडणवीस म्हणाले, ''मी पुन्हा एकदा सांगतो. मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे. आपल्याला कल्पना आहे, की ज्यावेळेस परकीय आक्रमकांनी भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस ती जीवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जीवंत ठेवण्याकरिता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहीत आहे की पानिपतची लढाई मराठे जे लढले होते, अहमदशाह अब्दालीने त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं, की ''मला आताच्या पाकिस्तानमध्ये पंजाब आहे त्या पंजाबपासून तंजावरपर्यंत हा मुलुख आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका. उर्वरित भारत मराठ्यांचा आहे असा आम्ही मान्य करू.'' पण, मराठ्यांनी ते केलं नाही. मराठे अखंड भारत वाचवण्यासाठी पानिपतच्या लढाईला गेले होते.'' असे फडणवीस म्हणाले.

मराठी माणसाचं Contribution -

तसेच, ''आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त contribution देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं contribution या देशाच्या इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही. आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे.'' अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

निशिकांत दुबे यांचे वादग्रस्त वक्तव्य -

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी समाजाला उद्देशून वक्तव्य केलं होतं की, "तुम्ही कोणाची भाकरी खाताय? मुंबईत टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणतेही महाराष्ट्रात युनिट नाही. टॅक्स देणारे बिहार झारखंड नाहीये का? टाटाने तर पहिली फॅक्टरी बनवली. आमच्या पैशांवर तुम्ही जगत आहात. हिंदी भाषिकांना मारता? मग उर्दू, तमिळ, तेलगू भाषिकांना का नाही मारत? जर खरोखर हिंमत असेल, तर बिहार, यूपी, तमिळनाडूमध्ये जाऊन दाखवा… जर तुम्ही आपल्या घरात, महाराष्ट्रात बॉस आहात तर चला बिहारमध्ये, चला उत्तर प्रदेश, चला तमिळनाडूमध्ये. तुम्हाला उचलून आपटू.''

मराठी समाजाच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या या विधानाने महाराष्ट्रातील भावना दुखावल्या असून, त्याविरोधात राज्यभरातून राजकीय, सामाजिक आणि नागरिक स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत