मुंबई : खंडणी, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या स्वयंघोषित बाबा अशोक खरातला मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खरातच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर केले होते. ईडीने पुढील कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने खरातची रवानगी तुरुंगात केली आहे.
अशोक खरातवर ४७.७४ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ईडीच्या तपासानुसार, अशोक खरातने खंडणी आणि धार्मिक फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेले अंदाजे ४७.७४ कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे फिरवले आहेत. हा गुन्हा करून कमावलेला काळा पैसा कायदेशीर दाखवण्यासाठी त्याने स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक मौल्यवान स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारासाठी खरातने एक मोठे जाळे तयार केले होते. त्याने भक्तांना संमोहन आणि इतर धमक्या देऊन त्यांच्या संमतीशिवाय त्यांची कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने राहता येथील ‘समता नागरी सहकारी पतसंस्थे’मध्ये तब्बल ६० बेनामी बँक खाती उघडली.
धक्कादायक बाब म्हणजे, यातील ४३ खाती मे २०२१ मध्ये एकाच दिवशी उघडण्यात आली होती. या खात्यांचा वापर करून त्याने कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद रोख व्यवहार केले. ईडीने खरातला मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्यापुढे हजर केले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खरातची ९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
राज्यभरात १२ गुन्हे दाखल
खरातविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासह अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात त्याच्यावर लैंगिक शोषण, बलात्कार, औषध देऊन अत्याचार करणे, खंडणी उकळणे आणि फसवणूक करणे अशा विविध कलमांखाली एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. सध्या राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक संबंधित गुन्ह्यांचा समांतर तपास करत आहे.