शेतकरी महिला विधेयक मंजूर; राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती 
महाराष्ट्र

शेतकरी महिला विधेयक मंजूर; राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुकुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात असलेल्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

भरणे यांनी बुधवारीच बहुचर्चित ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत मंजुरीसाठी सादर केले होते. गुरुवारी त्यांनी या विधेयकाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. शेतजमीन महिलांच्या नावावर करणे हा विधेयकाचा उद्देश नाही. तर कृषिक्षेत्र अथवा शेतीशी संबंधित क्षेत्रात ज्या महिला काम करतात, त्यांना स्वत:ची शेतकरी म्हणून ओळख मिळावी हा उद्देश असल्याचे भरणे यांनी सांगितले.

“हे केवळ शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा उद्देश या विधेयकाचा आहे. १५ ते २० टक्क्यांपेक्षा कमी महिलांची नावे सातबारावर आहेत,” असेही भरणे यांनी सांगितले.

५० टक्के जमीन महिलांच्या नावे करा : जयंत पाटील

या विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी शेतकरी पतीच्या नावावरील ५० टक्के शेतजमीन महिलांच्या नावे करण्याची मागणी केली. विधेयकाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करू नका. सातबारावर महिलांची नावे नोंद करा. कर्ज देताना वित्तीय संस्था महिला शेतकऱ्यांना विनातारण कर्ज देणार आहेत का? महिला शेतकऱ्यांकडून काय तारण घेणार याचा खुलासा करा? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

महिलांना अर्धा एकर जमीन कशी देणार : भास्कर जाधव

आपल्या राज्यात शेतकरी होण्यासाठी किमान अर्धा एकर जमीन असली पाहिजे, असा कायदा आहे. त्यामुळे महिलांच्या नावावर जोवर अर्धा एकर शेती नसेल तर त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. ज्या महिलांना शेतकरी दर्जा देणार आहात, त्यांना अर्धा एकर जमीन कशी देणार, असा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

विधेयकातील तरतुदी

  • ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाल्यानंतर महिलांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडून शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळेल.

  • विविध सरकारी योजनेतून महिला शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांच्यासाठी राज्य महिला शेतकरी निधीची स्थापना केली जाणार आहे.

  • कृषीविषयक अर्थसहाय्य याशिवाय खते, बियाणे, पीक विमा, कृषी उत्पादन बाजारपेठेत पोहचवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

माहिती अधिकारातील नव्या नियमांना स्थगिती; कार्यकर्त्यांच्या आक्षेपामुळे सरकारचा निर्णय, फडणवीसांचे माहिती आयोगाला पत्र

लंडनमध्ये होणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’; मुंबईतील मराठी भाषा भवन २०२७ पर्यंत, उदय सामंत यांची माहिती 

ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’

राम मंदिर देणगी घोटाळा : शिक्षकाच्या घरातून परदेशी चलन जप्त