महाराष्ट्र

भाजपच्या चार महिला आमदारांना चोरांनी घातला ऑनलाइन गंडा

या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.

प्रतिनिधी

भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाइन गंडा घातला आहे. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आई आजारी असल्याचे कारण देत, या व्यक्तीने महिला आमदारांकडून पैसे उकळले. या प्रकरणी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऑनलाइन माध्यमातून हे पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आमदार माधुरी मिसाळ यांना एक दूरध्वनीवरून फोन आला. यावेळी त्या त्यांच्या कार्यालयात होत्या. संबंधित व्यक्तीने त्याची आई आजारी आहे. उपचारासाठी रक्कम लागणार असल्याचे सांगितले. दरम्यान, माधुरी मिसाळ यांना ते खरे वाटले. त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर गुगलपेद्वारे ३,४०० रुपये ट्रान्सफर केले; परंतु या भामट्याने अशाच प्रकारचे फोन हे आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांनाही केल्याचे लक्षात आल्यानंतर, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आमदार मिसाळ यांच्या लक्षात आले. दरम्यान, आमदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर माधुरी मिसाळ यांच्या मुलीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली आहे. ज्या क्रमांकावरून फोन आला, त्या क्रमांकाची आणि संबंधित व्यक्तीचा तपास पोलीस करत आहे. एकाच वेळी चार आमदारांना फसवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद; अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक! शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा

नेस्कोच्या जमिनीचे अधिग्रहण रद्द; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका