महाराष्ट्र

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा

कराड तालुक्यातील कोणेगाव या साध्या, शांत आणि मातीचा सुगंध जपणाऱ्या गावातून उभे राहिलेले रमेश चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र मदन चव्हाण हे आज केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाचा विषय ठरत आहेत.

Swapnil S

रामभाऊ जगताप/कराड

कराड तालुक्यातील कोणेगाव या साध्या, शांत आणि मातीचा सुगंध जपणाऱ्या गावातून उभे राहिलेले रमेश चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र मदन चव्हाण हे आज केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाचा विषय ठरत आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील वडिलांनी आयुष्यभर केलेले कष्ट, परदेशात झिजवलेले आयुष्य, संकटांशी दिलेला सामना आणि मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेली धडपड… या सगळ्याचे सोनं आज आफ्रिकेतील केनिया देशाच्या भूमीत चमकत आहे. ही कहाणी केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर एका वडिलांच्या त्यागाची, मुलाच्या जिद्दीची आणि “शेतीतूनही जग जिंकता येते” हे सिद्ध करणाऱ्या एका मराठी कुटुंबाची प्रेरणादायी गाथा आहे.

रमेश चव्हाण यांनी आयुष्याची सुरुवात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत केली. दहावी नापास झाल्यानंतर अनेकजण खचून जातात, मात्र त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. साताऱ्यातील वेण्णा नदीवरील कण्हेर धरणावर त्यांनी हेल्पर म्हणून काम सुरू केले. कमी शिक्षणामुळे रोजंदारीवर काम करावे लागत होते आणि त्यांना प्रतिदिन अवघे सहा रुपये एकवीस पैसे इतके मानधन मिळत होते. मात्र मनात मोठे स्वप्न होते, कष्ट करायचे आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायचे.

कण्हेर धरणावर काम करताना त्यांनी स्वतःला केवळ मजूर म्हणून मर्यादित ठेवले नाही. इराक, सौदी अरेबिया, दुबई आणि अबुधाबी येथे त्यांनी अनेक वर्षे प्रचंड कष्ट केले. परदेशातील कठीण वातावरण, कडक शिस्त, अनोळखी भाषा आणि घरापासून दूर राहण्याची वेदना यांवर मात करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले.

केनियामध्ये ३०० एकर जमीन

आज मदन चव्हाण यांनी केनियामध्ये आधुनिक कृषी प्रकल्पाच्या जोरावर स्वतःचे भव्य कृषी साम्राज्य उभे केले आहे. स्वमालकीची आणि लीजवरील मिळून जवळपास ३०० एकर जमीन, अत्याधुनिक ग्रीनहाऊस, आधुनिक सिंचन व्यवस्था, यांत्रिकीकरण आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून त्यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, वांगी, कारले, आलं, डाळिंब आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे.विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनांना केवळ स्थानिक बाजारपेठेतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मागणी आहे. 'कृषी ॲग्रो' आणि 'मालन ॲग्रो' या ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी केनियामध्ये मराठी माणसाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कंपनीत १०० ते १५० कामगार कार्यरत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो.

सहा रुपये एकवीस पैशांपासून कोट्यवधींच्या यशापर्यंत

रमेश चव्हाण यांनी कण्हेर धरणावर हेल्पर म्हणून अत्यंत कमी पगारावर काम सुरू केले. आज त्याच कुटुंबाने जागतिक कृषी उद्योग उभारून कोट्यवधी रुपयांची उलाढाल निर्माण केली आहे. संघर्ष, मेहनत आणि चिकाटीचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. वडिलांचे कष्ट, मेहनत आणि जिद्द यांचा आदर्श घेत मदन चव्हाण यांनी केनियामध्ये आधुनिक शेती, ग्रीनहाऊस आणि निर्यातक्षम उत्पादनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या शेतातील भाजीपाला आणि फळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत असून केनियामध्ये जणू महाराष्ट्राची कृषी क्रांती उजळून निघत आहे.धरणावरील हेल्पर ते ढाबा चालक, आदर्श शेतकरी आणि पुढे गावचे सरपंच असा रमेश चव्हाण यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. गावाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना 'आदर्श सरपंच' म्हणून गौरविण्यात आले.

Mumbai : बांधकाम व इमारत परवानगी मिळणार एआय आधारित; भारतातील पहिली AI आधारित प्रणाली कार्यान्वित, ‘मुंबई टेक वीक २०२६’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीचे लोकार्पण

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

कल्याण-बदलापूर महामार्ग ‘अर्धवट’च! एकाच महामार्गावर तीन वेळा विकासकामे

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स; नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांची समिती गठित