Photo : X
महाराष्ट्र

गजापूर दंगल पिडितांना न्याय नाहीच; 'विशाळगड धार्मिक राजकारणाचे नवे पर्व!' सत्यशोधन अहवाल प्रकाशित

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी झुंडीने गडावर गेलेल्या तथाकथित शिवभक्तांनी, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुसलमानवाडीवर हल्ला करून तेथील ४२ घरे उद्ध्वस्त केली. या रहिवाशांचा गडावरील अतिक्रमणांशी अजिबात संबंध नव्हता.

Swapnil S

मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी झुंडीने गडावर गेलेल्या तथाकथित शिवभक्तांनी, गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुसलमानवाडीवर हल्ला करून तेथील ४२ घरे उद्ध्वस्त केली. या रहिवाशांचा गडावरील अतिक्रमणांशी अजिबात संबंध नव्हता. या घटनेला १४ जुलै २०२५ रोजी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम (सीएसएसएस), सलोखा संपर्क गट आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) या संस्थांनी एकत्रितपणे 'विशाळगड धार्मिक राजकारणाचे नवे पर्व!' हा सत्यशोधन अहवाल प्रकाशित केला आहे.

या प्रसंगी माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्यांची घरे विशाळगड आणि गजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याच्या आधीपासून तेथे उभी आहेत, अशांनाही बेकायदेशीर बांधकाम म्हणून पुरातत्त्व खाते व जंगल खात्याकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण कशाला म्हणायचे, हा मुद्दा विशाळगडावरील कारवाईच्या निमित्ताने कळीचा ठरलेला आहे.

एक वर्ष झाले तरी पिडीतांना न्याय मिळालेला नाही. भरपाई दिली ती अगदी जुजबी होती आणि तीदेखील सर्वांना मिळालेली नाही. त्यांची घरे फोडली, सोने लुटले, पैसे लुबाडून नेले. हल्ल्याचे लक्ष्य अतिक्रमण नसून गजापुरची देखरेखीखाली एसआयटीद्वारे रीतसर चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, असे सीएसएसएस चे संचालक इरफान इंजिनियर म्हणाले.

विशाळगडावरील मलिक रेहान दर्याच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांमुळे येथील पंचक्रोशीला रोजगार मिळतो. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादाचा परिणाम दर्याच्या पर्यटनावर झालेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरकरणी धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढले जात आहेत, त्यांच्या मुळाशी आर्थिक हितसंबंध असल्याचे निरीक्षण सलोखा संपर्क गटातर्फे संपत देसाई यांनी नोंदवले.

अहवालातील निरीक्षण

रोजी-रोटीच्या शोधात अनेक कुटुंबे या परिसरातून विस्थापित झाल्याची माहिती शांतीसाठी स्त्री संघर्ष मंच, कोल्हापूर या संस्थेतर्फे रेहाना मुरसल यांनी दिली. धार्मिक तणावाचे मुद्दे उकरून काढून अल्पसंख्य समाजाची सामाजिक आणि आर्थिक कोंडी केली जात असल्याबद्दल एपीसीआर संस्थेचे मुंबईचे कार्याध्यक्ष असलम गाझी यांनी चिंता व्यक्त केली. सत्ताधारी नेत्यांनी विशाळगड आणि औरंगजेब यांबद्दल केलेली भाषणे यांमुळे हल्लेखोरांना एक प्रकारे बळच मिळाले, असे सीएसएसएस चे संचालक इरफान इंजिनियर म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर