मुंबई : गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारताबाहेरील एका देशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत मंडळांना एकूण २ कोटी २७ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर
शाडूच्या मातीच्या मूर्ती, बीज गणपती, निर्माल्य संकलन आणि पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त उत्सव, एलईडी सजावट आणि सौरऊर्जेवरील मंडप याबाबत राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण तसेच कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याचे उपक्रम राबविण्यात येतील. जलस्रोतांना बाधा होणार नाही, याची दक्षता घेत जलसंवर्धनाबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त प्रोत्साहन
राज्यातील ३६ जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील १० राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम
नवी दिल्लीत पाच दिवस, तर मुंबईत आठ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
प्रमुख गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांच्या ऑनलाइन दर्शनासाठी स्वतंत्र पोर्टल