महाराष्ट्र

विधानसभेच्या तयारीला लागा! उद्धव ठाकरे यांचा आदेश; भाजपसोबत हातमिळवणी नाहीच

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती.

Swapnil S

मुंबई : महाविकास आघाडी म्हणून लढताना पक्षाला मोठा विजय मिळाला नसला तरी तो समाधानकारक आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह नसतानाही आपण ही निवडणूक लढलो व चांगले यश मिळविले. त्यामुळे आता लगेचच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान आपल्याला ‘नकली पक्ष’ आणि मला ‘नकली संतान’ म्हणून हिणविले. हा आपला अपमान आहे. त्यामुळे भाजपसोबत कधीच हातमिळवणी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. निवडणुकीतील विजयाबरोबरच ज्या मतदारसंघात पक्षाच्या तसेच आघाडीतील उमेदवारांचा पराभव झाला, तेथील कारणे त्यांनी जाणून घेतली. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावाही उद्धव ठाकरे यांनी घेतला.

उद्धव ठाकरे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना आपण भाजपला हरवू शकतो हे दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणुकीतून भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करतानाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे, याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केला.

शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल शाहू महाराजांना पुष्पगुच्छ भेट देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. शाहू महाराज यांचे धाकटे चिरंजीव मालोजीराजे छत्रपती, काँग्रेस आमदार सतेज पाटील यावेळी उपस्थित होते.

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

पावसाला सुट्टी नाहीच! रविवारचा दिवस पावसाने गाजवला; मुंबई शहर, उपनगरात धुवांधार कायम