कोल्हापूर : मदर डेअरी, अमूलपाठोपाठ गोकुळ दुधाच्या दरातही वाढीचे संकेत देण्यात आले आहेत. गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी तसे सुतोवाच केले आहे.
शनिवारी होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोनच दिवसांपूर्वी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आता गोकुळनेही दूध दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास वाढलेल्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना त्याची झळ बसणार आहे.
अमूलने दूध दरात वाढ केल्याने गोकुळही आपले दर वाढवणार असल्याचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. दुधाच्या विक्री दरात वाढ केल्यानंतर दूध उत्पादकांनाही दर वाढवून द्यावा लागणार आहे. तसे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे गोकुळचे चेअरमन राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.