महाराष्ट्र

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर दोन जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने मंगळवारी (दि. १४) हा निर्णय दिला.

नेहा जाधव - तांबे

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर दोन जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने मंगळवारी (दि. १४) हा निर्णय दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे, या बहुचर्चित प्रकरणातील सर्व १२ आरोपी आता जामिनावर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शरद कळसकरची सुटका नाही

न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला असला तरी, शरद कळसकर याची सुटका होणार नाही. कारण २०१३ मधील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले असून, सध्या त्याच्या शिक्षेविरोधातील अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे कळसकर मात्र शिक्षा पूर्ण होईपर्यंत तुरुंगातच राहणार आहे.

पानसरे कुटुंबियांची मागणी फेटाळली

मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दिघे यांनी सांगितले की, "आरोपींनी दाखल केलेले जामिनाचे अर्ज मंजूर करण्यात येत आहेत; सविस्तर आदेश नंतर दिला जाईल."
पानसरे यांच्या कुटुंबाच्या वकिलांनी आदेश स्थगित ठेवण्याची विनंती केली होती, मात्र खंडपीठाने ती मागणी फेटाळून लावली.

२०१५ पासून प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत

२० फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) केला, नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) ही चौकशी सोपवण्यात आली. मात्र, आज १० वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही न्यायालयीन निकाल लागलेला नाही.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडेचे नाव पानसरेच नव्हे, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातही आले होते. २०१८ मध्ये कोल्हापूर न्यायालयाने पानसरे प्रकरणात त्याचा जामीन मंजूर केला होता, मात्र दाभोलकर प्रकरणात तेव्हाही तो कारागृहातच होता. १० मे २०२४ रोजी दाभोलकर प्रकरणात निर्दोष सुटल्यावर तावडे कारागृहातून बाहेर आला. मात्र, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने १६ जुलै २०२४ रोजी पानसरे प्रकरणातील त्याचा जामीन रद्द केला. अखेर, आज उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून पुन्हा जामीन मंजूर झाला आहे.

आधीच जामिनावर असलेले आरोपी

या प्रकरणातील इतर ९ आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला होता. त्यात सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी, वासुदेव सूर्यवंशी आणि समीर गायकवाड यांचा समावेश आहे. आता सर्व आरोपी जामिनावर सुटल्याने तपास आणि न्यायालयीन सुनावणीची पुढील दिशा काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास

पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी