संग्रहित छायाचित्र, पीटीआय
महाराष्ट्र

महायुतीचे १७३ जागांवर एकमत; भाजपला सर्वाधिक जागा देण्याचा बैठकीत निर्णय, उर्वरित ११५ जागांवर नंतर निर्णय होणार

विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच, आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीत ‘उलट्यां’मुळे नाराजीचा खडा पडला असल्याचे चित्र दिसत असले तरी जागावाटपाच्या बैठकीत मात्र तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच, आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीत ‘उलट्यां’मुळे नाराजीचा खडा पडला असल्याचे चित्र दिसत असले तरी जागावाटपाच्या बैठकीत मात्र तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे. जागावाटपाच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील २८८ पैकी १७३ जागांवर शिंदे-फडणवीस-अजितदादांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागावाटपाबाबतची दुसरी फेरी शनिवारी नागपुरात पार पडली. जवळपास ३ तास रंगलेल्या या बैठकीत तिन्ही पक्षांनी १७३ जागा कुणी लढवायच्या, याचा निर्णय घेतला आहे. याच बैठकीत मोठा भाऊ भाजपला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील, यावरही तिन्ही पक्षांचा सूर जुळला. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून निर्णय झालेला नाही. उर्वरित ११५ जागांचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी त्यावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. महायुतीतील घटक पक्षांनाही जागा सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. विशेष म्हणजे, लोकसभेला शेवटच्या क्षणी जागावाटप झाले, त्याचा फटका महायुतीला राज्यात बसला. यावेळी मात्र सुरुवातीलाच जागावाटपाचा निर्णय घ्यायचा, असा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून त्यासाठी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून जोमाने तयारी केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये ६० पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत आहे. २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा राष्ट्रवादीला मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ६० जागा मिळू शकतात.

भाजपला १४० ते १५० जागा?

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे. भाजप १४० ते १५० जागा लढवू शकते. शिंदेंच्या शिवसेनेला ७० जागांवर, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ६० जागांवर उमेदवार उतरवण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, अंतिम जागावाटप १० दिवसांमध्ये जाहीर करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जागा जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी

शनिवारी रात्री झालेल्या या बैठकीत विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्याबाबत एकमत झाल्याची चर्चा आहे. जो पक्ष जी जागा जिंकू शकेल, त्यालाच आम्ही महत्त्व देत आहोत. उमेदवारांची क्षमता पाहून कोणत्या पक्षाला तिकीट जाईल, हे निश्चित होणार आहे. सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येईल. केवळ विजय हेच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागांचा आग्रह कोणत्याही पक्षाने धरलेला नाही. वेळ पडली तर एक पाऊल मागे घेण्याचीदेखील तयारी असेल. १० सप्टेंबरनंतर महायुतीचे नेतेच जागावाटप जाहीर करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची ताकद वाढणार

राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळेला अजितदादांसोबत ४४ आमदार आले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काँग्रेसकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती मिळते. तसेच काँग्रेसचे हिरामण खोसकर आणि सुलक्षा खोडके यासुद्धा राष्ट्रवादीसोबत येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे हे अपक्ष आमदार आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हेसुद्धा आपल्यासोबत येणार असल्याचे अजितदादांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी