मुंबई : मुंबईसह राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक वेशातील स्त्री-पुरुषांची मांदियाळी... डोक्यांवरील शोभा वाढविणारे फेटे... महिला व पुरुषांची मोटारसायकल व गाड्यांची रॅली, लेझीम... शोभारथ... पालखी... कोळी नृत्य... आदिवासींचे तारपा नृत्य... अशा थाटामाटात मंगळवारी हिंदू नववर्षारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. गिरगाव, लालबाग, चिंचपोकळी, करी रोड, वरळी, दादर, परळ, विलेपार्ले, कुर्ला, बोरिवली, दहिसर, डोंबिवली, कल्याणसह राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रांसह विविधांगी कार्यक्रमांद्वारे गुढीपाडव्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी शोभायात्रांमध्ये अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायला नागरिकांची झुंबड उडाली होती.
यंदाही गिरगावात शोभायात्रा काढून पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. गिरगाव, दादर, परळ, ठाणे, डोंबिवलीतही शोभायात्रांचा जल्लोष दिसून आला. यात तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिला, तरुणाईने पारंपरिक वेषभूषेत बुलेटस्वारी केली. लालबाग-परळमध्ये दांडपट्टा, पारंपरिक खेळ आदीचे सादरीकरण करण्यात आले.
सकाळपासूनच ढोलताशांच्या गजरात अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या. ढोलताशा पथकांचे सादरीकरण, पारंपरिक वेशातील महिलांचा सहभाग, तर काही ठिकाणी शोभायात्रेत चित्ररथ सहभागी झाले होते. वाटेत जागोजागी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या नागरिकांसाठी बक्षिसेही ठेवण्यात आली होती. उत्कृष्ट वेशभूषेसाठी आकर्षक भेटवस्तूही दिल्या गेल्या. या शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गुढीपाडव्याच्या सणामुळे मुंबईतील अवघे वातावरण जल्लोषमय झाले होते.
कुर्ला येथे नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (प.) तर्फे यंदाच्या वर्षी "मंदिरे हीच राष्ट्रमंदिरे" या संकल्पनेअंतर्गत देशातील १२ मोठ्या मंदिरांची महती सर्वांसमोर ठेवण्यात आली. सर्वेश्वर मंदिर, गौरीशंकर मंदिर, जयभवानी चौक, शिक्षक नगर या ४ ठिकाणांहून सकाळी ११ वाजता मिरवणुकांना सुरुवात झाली. यात्रेत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल, रखुमाई, जगन्नाथ मंदिर आधी चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच लहान मुलींचे लेझीम पथक, शिवकालीन शस्त्रकला, कोळीनृत्य, नाशिक ढोल पथक, पुणेरी ढोल पथक यांनी प्रात्यक्षिके सादर केली.
खरेदीसाठी बाजार फुलले
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू प्रवेश करण्याची परंपरा असल्याने मुंबईत बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सराफा बाजारात अनेकांनी दागिने खरेदी केले. जुने दागिने मोडून नवीन दागिनेही करण्यात आले. यामध्ये नेकलेस, गंठण, पाटल्या, ब्रेसलेट, अंगठी, कर्णफुले यासह कलाकुसरीच्या दागिन्यांचा समावेश होता. काही जणांनी चांदीचे दागिने तयार करण्यासाठी ऑर्डर दिल्या. गुढीपाडव्याला मोठी उलाढाल होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.