मुंबई : मत्स्य खाद्य खरेदीसाठी नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील, तसेच स्थानिक उत्पादकांना चालना मिळणार आहे. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्य खाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला. तसेच शासनाच्या नोंदणीकृत मत्स्य उत्पादकांकडून मत्स्य खाद्य खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाची मत्स्य खाद्य खरेदीसंदर्भात नवीन अधिसूचना राज्यात लागू करण्याच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्याच्या स्थितीत मत्स्य खाद्य मुख्यतः राज्याबाहेरून आयात करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी व गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मत्स्य खाद्याला सुरक्षित पॅकिंग असणे गरजेचे
मत्स्य खाद्य भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण प्रमाणित असणे गरजेचे आहेत. प्रथिन, स्निग्ध, आर्द्रता, कर्बोदके इत्यादी पोषणमूल्यांचे विश्लेषण व उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख पॅकिंगवर स्पष्टपणे नमूद असावी. पुरवठ्याच्या वेळी अधिकृत पावती किंवा करबिल देणे अनिवार्य आहे. मत्स्य खाद्य हवाबंद आणि सुरक्षित पॅकिंग असणे गरजेचे आहे.