लातूर : राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून अनेक मंत्री विमान आणि हेलिकॉप्टरने हवाई प्रवास करत आहेत. त्यासाठीच, मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांचे परतीचे हवाई उड्डाण बुधवारी रद्द करण्यात आले. हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मंत्री पाटील यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
लातूर येथून संध्याकाळी विमान उड्डाणास मर्यादा
ॲव्होसेट एव्हिएशन कंपनीचे सहा आसनी विमान लातूर विमानतळावरून साडेचारच्या सुमारास उड्डाण करणार होते. त्यासाठी, हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्स मिळण्याची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दर्शवली. तसेच संध्याकाळी लातूर येथून विमान उड्डाणास मर्यादा असल्याने अखेर आजचे हवाई उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा नाही, त्यामुळे गुलाबराव पाटील यांना रस्तेमार्गाने कारने प्रवास करावा लागला. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांना चारचाकी वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व्हावे लागले. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
नेते, मंत्री विमान प्रवासावेळी घेताहेत काळजी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या बैठका व सभा घेण्यासाठी बारामतीला जात असताना विमान अपघात होऊन त्यांचे अकाली निधन झाले. या निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला. मात्र, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यातील बडे नेते, मुख्यमंत्री, मंत्री विमान प्रवास करताना विशेष काळजी घेत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्येही बिघाड असल्याने त्यांच्यासाठी दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये झाला बिघाड
पंकजा मुंडे ह्या छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. पंकजा मुंडें म्हणाल्या की, मी सकाळी साडे दहा वाजता निघणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेक ऑफ होणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे काल हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते, हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे सांगण्यात आले. मात्र जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे त्यावरून मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.