महाराष्ट्र

हनुमान चालीसा पठण प्रकरण: राणा दाम्पत्याच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर २ डिसेंबरला निर्णय

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रतिनिधी

मुंबई : हनुमान चालीसा पठण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा दाम्पत्याच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर कनिष्ठ न्यायालयाने २ डिसेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतल्याने न्यायाधीश राहुल रोकडे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यात दोषमुक्त करण्याची विनंती करीत सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुमेश पांजवानी यांनी राणा दाम्पत्याच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर जोरदार आक्षेप घेतला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणचा प्रयत्न करून सामाजिक सौहार्द बिघडवले. कथित गुन्ह्यासंबंधी दोघांविरुद्ध सीसीटीव्ही फुटेजचा ठोस पुरावा आहे. त्यामुळे न्यायालयाने राणा दाम्पत्याचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळावा आणि खटला चालवण्यास मुभा द्यावी, अशी विनंती केली. याची दखल घेत न्यायालयाने अर्जावरील सुनावणी २ डिसेंबरला निश्चित करताना निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक