महाराष्ट्र

हरिहरेश्वर, श्रीवर्धन पर्यटनस्थळांचा विकास करणार; केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश, प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश

रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तिर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या महत्वाच्या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तिर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. प्रस्तावाच्या मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, मारळ व श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. बैठकीत श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास व सौंदर्यीकरण, तसेच मारळ येथे प्रस्तावित स्टार गेजिंग (आकाश निरीक्षण केंद्र) या दोन्ही प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. हरेश्वर प्रकल्पासाठी २२ कोटी ६६ लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. मारळ येथील प्रस्तावित स्टार गेजिंग सुविधा ही रायगड जिल्ह्यातील पहिली प्रगत खगोल निरीक्षण केंद्र असणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च २५ कोटी ६ लाख रुपये अपेक्षीत आहे.

पर्यटन विकासाच्या या आराखड्यामुळे रायगड जिल्ह्यातील अध्यात्मिक, निसर्ग, खगोल पर्यटनाला नवे बळ मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राजकोट किल्ला पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे आरमार नौदल संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८३ फूट उंच पुतळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढू शकते. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात स्थापन केलेल्या आरमाराचा इतिहास कळावा, माहिती मिळावी, छत्रपतींच्या आरमारापासून आजच्या आधुनिक नौदलाच्या प्रवासाचं दर्शन घडावे, यासाठी राजकोट किल्ला परिसरात भव्य आरमार - नौदल संग्रहालय उभं राहण्यासह परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही पवार यांनी दिले. प्रकल्पासाठी जागा खाजगी व्यक्तीकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही चर्चेतून, सामोपचारांने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव