जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारीही जोर कायम ठेवला. सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून तापी नदीला मोठा पूर आला आहे. हतनूर धरणाचे तब्बल ४१ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सुमारे ३ लाख ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील पूर्णा नदी तसेच मध्य प्रदेशातील पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. वाढती पातळी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे, तापी महामंडळाचे अधीक्षक अभियंता भोसले आणि कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी यांनी धरणाची पाहणी केली.
दरम्यान, गिरणा धरण ९७ टक्के भरले असून त्याचे दोन दरवाजे उघडून २,५०० क्युसेक, तर अंजनी धरणातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसामुळे पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथे बापू जाधव (७५) यांचा घराची भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला. तर शेवगे (ता. पारोळा) येथील समाधान चुडामण भिल (२२) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का लागून गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १५ घरांचे नुकसान झाले असून ३२ कुटुंबे पूरग्रस्त झाली आहेत. विविध ठिकाणी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. जळगाव शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले. गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, अजिंठा चौक, प्रभात कॉलनी, सुप्रीम कॉलनी आणि नवीपेठ परिसरात पाणी साचल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, भडगाव तालुक्यातील बात्सर येथे पुरात अडकलेल्या पाच बालके आणि तीन महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. भुसावळ, बोदवड आणि यावल तालुक्यातही प्रशासनाने सतर्कता वाढवून बचाव व निचऱ्याची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.
महापौर ऑन फिल्ड
महापौर दीपमाला काळे यांनी पहाटेपासून सलग सहा तास शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्यांनी नाल्यांतील अडथळे हटविणे, पाण्याचा निचरा करणे, गांधी मार्केटमधील तळमजल्यात शिरलेले पाणी अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढणे, तसेच पांडे चौक परिसरात नाल्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तातडीचे आदेश दिले. शहरात कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
एक महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका
अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या पुरामुळे एका घरात एक महिन्याच्या बाळासह कुटुंब अडकले होते. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेचे आरोग्य व अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. जोरदार प्रवाहामुळे दोर व लाइफ जॅकेटच्या सहाय्याने साखळी तयार करून सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर आईसह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुखरूप हलविण्यात आले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. पाण्याखाली गेलेले पूल, नदी-नाले किंवा वेगवान प्रवाह ओलांडू नयेत. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष दक्षता घ्यावी. तुटलेल्या वीजवाहिन्या, वीजखांब आणि पाण्याने वेढलेल्या भागांपासून दूर राहावे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्याची खबरदारी घ्यावी.रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव