संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

‘मी’ पुन्हा येणार; भाजप विधिमंडळ नेतेपदाची आज निवड , ज्युपिटरमध्ये उपचार करून एकनाथ शिंदे अखेर मुंबईत दाखल, गृह खात्यावरून अजूनही रस्सीखेच

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष सोडवण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. अखेर शपथविधीच्या एक दिवसआधी म्हणजेच बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सकाळी १० वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष सोडवण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. अखेर शपथविधीच्या एक दिवसआधी म्हणजेच बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सकाळी १० वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे. याचा अर्थ, विधानसभेच्या निकालानंतर ११ दिवसांनी राज्याला मुख्यमंत्री मिळणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ‘छप्पर फाड के’ यश मिळाले असून तब्बल २३० जागा त्यांनी पटकावल्या आहेत. भाजपने १३२ जागा जिंकल्या असून शिवसेना शिंदे गटाने ५७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर बाजी मारली आहे. इतके सर्व असूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा महायुतीला अर्थात भाजप पक्षश्रेष्ठींना सोडवता आला नव्हता. भाजपने सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी सकाळी होणार आहे. सर्वानुमते नेता निवडण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच हाईल असे मला वाटते, असे रूपाणी यांनी सांगितले.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी निघून गेले. त्यानंतर आजारी पडलेल्या शिंदे यांच्यावर मंगळवारी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर ते चार दिवसांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर शिंदे यांना भेटण्यासाठी अनेक नेत्यांची रीघ लागली होती.

उपचारानंतर मुख्यमंत्री ‘वर्षा’वर

दरे या मूळ गावी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावली. तेव्हापासून त्यांना सर्दी, ताप आणि घशाचा संसर्ग झाला आहे. रविवारी दुपारनंतर ठाण्यात पोहोचल्यावर शिंदे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अद्याप त्यांची प्रकृती सुधारलेली नाही. मंगळवारी त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन काही तपासण्या करून घेतल्या. त्यांच्या डेंग्यू आणि मलेरियाच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून पांढऱ्या पेशी कमी-जास्त होत आहेत. अँटीबायोटिक औषधांचा डोस दिल्यामुळे त्यांना अशक्तपणाही आला होता. मात्र, उपचारानंतर मुख्यमंत्री आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

शपथविधीला मोदी, २२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध २२ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच साधुसंत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ४० हजार कार्यकर्तेही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

शिंदेंच्या नाराजीला महाशक्तीची रसद - उद्धव

एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीला भाजपचे दिल्लीतील काही नेतेच रसद पुरवत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत केला आहे. महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा सुरू असलेला तिढा आणि शिंदेंची नाराजी ही दिल्लीतील महाशक्तीच्या कृपेने सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल. पण एकदा निवडणुकीचा हेतू साध्य झाला की, त्यांचे काय करायचे ते करेल. भाजपचा मूळ उद्देश मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा आहे.”

शिंदे, फडणवीस समर्थकांची बॅनरबाजी

महायुतीत सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू असताना फडणवीसांच्या समर्थकांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरात फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे बॅनर लावले आहेत, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनी विमानतळापासूनच्या मार्गावर मोदींच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत.

गृह खाते फडणवीस स्वत:कडेच ठेवणार?

भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे व ते गृह खाते स्वत:कडेच ठेवणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. अर्थ, गृह, महसूल या महत्त्वाच्या खात्यांपैकी एक तरी खाते आपल्याला मिळावे, असा एकनाथ शिंदेचा आग्रह आहे.

फडणवीस शिंदेंच्या भेटीला, खातेवाटपावर चर्चा

शिंदे आणि फडणवीस यांच्यात मंगळवारी संध्याकाळी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्याआधी शिंदे यांची उदय सामंत आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या अँटीचेंबरमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी रात्री शिवसेना नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास