नवी दिल्ली : जनताच सर्वोच्च आहे, सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, असाच संदेश बांगलादेशातील घडामोडींनी जगाला दिला आहे, असा सूचक इशारा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान मोदी यांना दिला.
बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करून अत्याचार केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात धमक असेल तर त्यांनी या हिंदूंचा बचाव करावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
युक्रेनमधील युद्ध नरेंद्र मोदी थांबवू शकतात तर त्यांनी बांगलादेशमध्येही तशीच पावले उचलावी आणि तेथील हिंदूंचे रक्षण करावे. इस्रायल आणि श्रीलंकेतही अशाच प्रकारची निदर्शने झाली. त्यापासून आपण धडा घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले असून ते इंडिया आघाडीच्या नेत्यांशी विधानसभेच्या निवडणुकांबाबत चर्चा करणार आहेत. बुधवारी सकाळी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत जनतेने मतदानातून आपला कौल दाखवला आहे. त्यामुळे जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. जनतेचा संयम सुटला तर बांगलादेश, पाकिस्तान, इस्त्रायलप्रमाणे स्थिती भारतात निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळाल्याने मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्षांनी मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार, असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री होऊ की नाही जनता ठरवेल
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते स्वप्नांतही नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे जनता आणि शिवसैनिक ठरवतील.
विनेश फोगटची उत्तम कामगिरी
विनेश फोगट हिने ऑलिम्पिक स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली आहे. तिने आंदोलन केले त्यावेळी तिच्यावर आरोप करण्यात आले होते. आपल्या देशात शेतकरी, खेळाडू यांना अतिरेकी ठरवले जात आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
इंडिया आघाडी एकसंधपणे लढणार
महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणे निवडणूक लढवावी, एकमेकांचे सहकार्य कशा प्रकारे घेऊ शकतो, यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशात सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेतही अशीच स्थिती निर्माण झाली होती. मणिपूर, काश्मीरमध्येही हिंदुंच्या हत्या होत आहेत. त्यामुळे मोदींनी हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बुधवारी उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह अन्य घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची भेट घेतली.