महाराष्ट्र

अवैध वृक्षतोड, तर ५० हजारांचा दंड; वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत.

Swapnil S

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो; मात्र हा दंड कमी असून, यामध्ये आता अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

दरम्यान, विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न मांडला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भिमराव तापकीर, संजय सावकारे, मनीषा चौधरी, राम कदम यांनी भाग घेतला.

विनाकारण वृक्षतोडीची परवानगी मागितल्यास, त्याची शहानिशा करून विहीत कालावधीत परवानगी देण्याबाबतची कार्यपद्धती आणण्यात येईल. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार, राज्यामध्ये २०१५ पासून वृक्षलागवड मोहिमेमुळे वनेतर क्षेत्रातील हरीत आच्छादनात २ हजार ५५० चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे.

मॅग्रोव्ह वनामध्ये झालेल्या वाढीत राज्य प्रथम

तसेच मॅग्रोव्ह वनामध्ये झालेल्या वाढीमध्ये राज्य क्रमांक एकवर आहे. वृक्षलागवडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘माँ के नाम एक वृक्ष’ ही घोषणा केली आहे. उद्योगांकडून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन क्रेडीटबाबत सुस्पष्ट धोरणाची आवश्यकता आहे. उद्योगांनी जेवढे कार्बन उत्सर्जित केले, तेवढे वृक्ष लावले पाहिजेत. राज्यात एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी (फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकरी विदेशी जातीचे वृक्षही लावू शकतात

शेतकरी विदेशी जातीचे वृक्षही लावू शकतात. त्यावर कुठलेही बंधन नाही. वनशेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. बांबू प्रजातीच्या ८ जातींना १७५ रुपये अनुदान तीन वर्षांपर्यंत देण्यात येत आहे. हे अनुदान आता १९ हजार हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशाऐवजी बांबूपासून बनविलेले बांबू पॅलेट्स उपयोगात आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित उपवनसंरक्षक यांच्यास्तरावर दर दोन महिन्यांनी लोकप्रतिनिधींसमावेत बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतील. या बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील वन विषयक अडचणी आणि समस्यांचे समाधान करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

आंबा, काजू, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा