मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगसमूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा समाजमाध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. याच माध्यमातून ते सर्वसामान्यांशी जोडले आहेत. अनेकदा, सर्वसामान्य नेटीझन्सच्या ट्विटला रिप्लाय देतात, तर त्यांच्या जुगाड क्रिएटीव्हीटीचे कौतुकही करतात. देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आणि प्रेरणादायी युवकांना ते चक्क महिंद्रांच्या चारचाकी नव्या कोऱ्या गाड्याही भेट देतात. त्यामुळे, उद्योगपती आनंद महिंद्रा नेटीझन्सशी अधिकच जोडलेले आहेत. आता, महिंद्रा यांनी कोल्हापुरातील विमानतळाचे फोटो शेअर करत त्याच्या वास्तुकलेचे कौतुक केले आहे.
कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, त्यानंतर प्रवाशांच्या सेवेत ते सुरू होईल. इंडियन टेक अंड इन्फ्रा या ट्विटर अकाऊंटवरून या विमानतळाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रांनी हे ट्विट रिट्विट करत, कोल्हापूरमधील नवीन विमानतळाच्या वास्तूचे कौतुक केले आहे. स्टील, काच आणि क्रोमचा वापर करून आणखी एक नवे विमानतळ उभारलेले नाही तर स्थानिक इतिहास आणि वास्तुकलेच्या आधारावर ओळख टिकवणारी विमानतळाची ही नवीन वास्तू आहे, जे तेथील गावचा इतिहास आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.