महाराष्ट्र

ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजतच! मतदार निवडणुकीत उमेदवारांना विचारणार जाब

Swapnil S

सुनील नलावडे/ रत्नागिरी

रत्नागिरी शहराचे उपनगर बनलेल्या तसेच दिवसेंदिवस नव्या इमारती, गृहनिर्माण संकुल आणि व्यापारी बाजारपेठा, वाढत्या लोकसंख्येमुळे कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी वारंवार निवेदन देऊन घनकचरा प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने मागणी केलेली जमीन तातडीने उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी अद्याप मार्गी लागलेली नाही. त्यामुळे कुवारबाव ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्प कधी मार्गी लागणार आहे, असा सवाल केला जात आहे. याबाबत आता ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत या निवडणुकीत मतदार उमेदवारांना जाब विचारणार आहेत.

कुवारबाव ग्रामपंचायतने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन मागील उपलब्ध असलेल्या सुमारे ८० गुंठे जमिनीपैकी काही जमीन या घनकचरा प्रकल्पासाठी मिळावी अशी एका प्रस्तावाद्वारे मागणी केलेली आहे. मात्र एक वर्ष होऊन गेले तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून सदर प्रस्ताव मंजूर होऊन आलेला नाही अथवा त्या प्रस्तावाचे काय झाले हेही कळविले जात नाही. पालक मंत्र्यांनी घंटागाडी घ्या आणि कचरा उचला अशा वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र उचललेला कचरा घनकचरा प्रकल्प नसल्याने टाकणार कोठे हा प्रश्न काही सुटलेला नाही.

मध्यंतरी घंटागाडीत घेऊन कुवारबाव येथील कचरा नाचणे ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पात नेऊन टाकावा असे पालक मंत्र्यांनी सूचित केले होते. मात्र प्रत्यक्षात नाचणे ग्रामपंचायतीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कुवारबावचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प जागे अभावी मार्गी लागू शकलेला नाही. जागा नाही म्हणून घनकचरा प्रकल्प होऊ शकत नाही. प्रकल्प नाही म्हणून घंटागाडी नाही आणि घंटागाडी नाही म्हणून स्थानिक रहिवासी आणि व्यापारी पत्रकार कॉलनी जवळील नाल्यांमध्ये संपूर्ण गावचा कचरा आणून टाकत आहेत.

मात्र सातत्याने प्रयत्न करूनही रौप्य महोत्सवी वाटचाल करणाऱ्या कुवारबाव ग्रामपंचायतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्षापूर्वी सादर केलेला प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांकडे येणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

शासकीय जागा रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मागे गेली कित्येक वर्षे उपलब्ध असूनही कचरा प्रकल्पासाठी ती का उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामध्ये कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत का, असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून विचारला जात आहे. प्रशासन आता कोणती भूमिका घेते याची आता ग्रामस्थ वाट पाहत आहेत.

स्थानिक ग्रामस्थ हवालदिल

मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने स्थानिक ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मोकाट कुत्री नाल्यामध्ये आणून टाकलेल्या कचऱ्याच्या पिशव्या रस्त्यावर आणि आजूबाजूच्या रहिवाशांच्या घराजवळ आणून ही दुर्गंधी आणखीनच वाढवत आहेत. शिवाय रात्रभर या मोकाट कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. लहान मुले, आजारी वृद्ध रुग्ण यांना अतिशय त्रास होत आहे. यासंदर्भात कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठराव करून ग्रामपंचायतला दिला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त