मिरज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ ही दिलेली घोषणा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच गाजत आहे. मात्र, या घोषणेमुळे अल्पसंख्यांक मतदार गमावण्याच्या भीतीने महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली असून भाजप नेत्या पंकजा मुंडे, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी या घोषणेबाबत नापसंती व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या या घोषणेवर जोरदार टीका केली असून, ही घोषणा राज्यात चालणार नसल्याचा दावा केला आहे. त्यातच आता महायुतीतही या घोषणेवरून मतभेद निर्माण झाले असून भाजप नेतेही या घोषणेला स्पष्टपणे विरोध करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे भाजपसह महायुतीनेच या घोषणेचा धसका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घोषणेवरून भाजप आणि महायुतीमध्येच सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेबद्दल नापसंती व्यक्त केल्याचे वृत्त प्रकाशित झाले, मात्र नंतर पंकजा यांनी तातडीने त्याबाबत घूमजाव केले, तर भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, ही घोषणा असंबद्ध असून, जनता ती स्वीकारणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
पंकजा काय म्हणाल्या?
महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणेची गरज नाही. माझ्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. केवळ मी भाजपमध्ये आहे म्हणून मी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केल्याचे एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. पंकजा यांनी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने नुकतीच एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांनी या घोषणेबद्दल नापसंती व्यक्त केली होती. मात्र, मराठी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर घूमजाव करत अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
घोषणा अशोक चव्हाणांना अमान्य
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी, ही घोषणा असंबद्ध असून जनता ती स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या घोषणांचे आपण समर्थन करणार नाही. ‘विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र’ हे भाजपचे धोरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. व्होट जिहादलाही आपण महत्त्व देत नाही. आपले केवळ विकासाला प्राधान्य आहे आणि त्यामुळे पक्ष बदलला तरीही जनतेला आपली भूमिका रुचली आहे, असेही चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्राला हे विचार मान्य नाहीत - अजितदादा
महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे. इतर राज्यांची तुलना महाराष्ट्राशी होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेने कायमच जातीय सलोखा ठेवला आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येतात आणि त्यांचे विचार सांगतात. मात्र महाराष्ट्राला हे विचार मान्य नाहीत, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. अशोक चव्हाण, पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीमधील नेत्यांनीच भिन्न भूमिका मांडल्याने ‘बटेंगे’वरून महायुतीतच ‘बंटवारा’ झाल्याचे दिसून येत आहे.
पंकजा यांचे घूमजाव
आपण कोणत्याही सभेत असे वक्तव्य केले नाही, आपण पक्षाच्या स्टार प्रचारक आहोत. आपल्या सभा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आपल्याला हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असे पंकजा यांनी म्हटले आहे. मिरजमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंकजा यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’बाबत भाष्य केले. आपण कोणत्याही सभेमध्ये असे वक्तव्य केले नाही, मुद्रित माध्यमांमध्ये काय प्रकाशित झाले त्यावर आपण भाष्य करणार नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले आणि आपल्याच वक्तव्यावर घूमजाव केले.