महाराष्ट्र

भीमा कोरेगावात ‘जयभीम’चा नारा; शौर्यदिनी विजयस्तंभास लाखो अनुयायांमार्फत अभिवादन

जय भीमचा नारा, फडफडणारे नीळे ध्वज आणि आंबेडकरी चळवळीतील लाखो अनुयायांची विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उसळलेली गर्दी...अशा वातावरणात कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन बुधवारी साजरा करण्यात आला.

Swapnil S

पुणे : जय भीमचा नारा, फडफडणारे नीळे ध्वज आणि आंबेडकरी चळवळीतील लाखो अनुयायांची विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उसळलेली गर्दी...अशा वातावरणात कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन बुधवारी साजरा करण्यात आला.

मंगळवारी मध्यरात्रीपासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १० लाख अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडून देखील होणारी गर्दी लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी विविध नेतेमंडळींनी देखील अभिवादनासाठी हजेरी लावली.

बुधवारी २०७ व्या विजयदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. समता सैनिक दलासह महार रेजिमेंटकडून विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आनंदराज आंबेडकर तसेच इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केले. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, हिंमत जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रशासनाकडून सुरेख नियोजन

ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाने विजय स्तंभस्थळी केलेली व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या मार्गिका यामुळे अनुयायांची गैरसोय झाली नाही. पुणे पोलीस दलाकडून ५ हजार ६५३ जणांचा बंदोबस्त, तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून चार हजार ८०० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली होती. याशिवाय जागोजागी पोलीस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारण्यात आले होते. अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या वाहनांसाठी ४५ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली होती. तसेच वाहनतळापासून विजयस्तंभाभापर्यंत पीएमपी बसेसच्या माध्यमातून अनुयायांना ने-आण करण्याची मोफत सोय देखील करण्यात आली होती.

भीमा कोरेगाव येथे स्मारक व्हावे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता अभिवादन करण्यासाठी जमा होत असते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची २०० एकर जमीन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतूद महाराष्ट्र शासनाने, करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. पुणे येथील भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, सरचिटणीस गौतम सोनावणे, संघटन सचिव परशुराम वाडेकर, सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब जानराव शैलेश चव्हान, आशिष गांगुर्डे, मुंबईतून आलेले प्रकाश जाधव, सोहेल शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवलेंचे काव्यातून अभिवादन

भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा

उंच होतो आमचा माथा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,

जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा,

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक