तापलेल्या जळगावात बिअर विक्रीत वाढ; दोन महिन्यांत विदेशी मद्य विक्रीत घट, तर २५.३५ लाख लिटर बिअरचे सेवन 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

तापलेल्या जळगावात बिअर विक्रीत वाढ; दोन महिन्यांत विदेशी मद्य विक्रीत घट, तर २५.३५ लाख लिटर बिअरचे सेवन

यंदाच्या उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी जळगावकरांनी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल २५ लाख ३५ हजार १४६ लिटर बिअरचे सेवन केले.

प्रतिनिधी

विजय पाठक / जळगाव

यंदाच्या उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी जळगावकरांनी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल २५ लाख ३५ हजार १४६ लिटर बिअरचे सेवन केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात बिअर विक्रीत २६ टक्के, तर मे महिन्यात ३९ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगावचे अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा वाढलेल्या तापमानामुळे रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. परिणामी देशी मद्याच्या विक्रीवर मात्र फारसा परिणाम झालेला नसून एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांत प्रत्येकी तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या दोन महिन्यांत मद्यप्रेमींनी २५ लाख ८ हजार ३३० लिटर देशी मद्याचे सेवन केल्याची नोंद आहे.

दरम्यान, वाईन विक्रीतही लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात तब्बल १७७टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल-मे २०२५ मध्ये १५ हजार २२ लिटर वाईनची विक्री झाली होती. तीच विक्री २०२६ मध्ये वाढून ४१ हजार २८६ लिटरपर्यंत पोहोचली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे मद्यविक्रीच्या आकडेवारीत झालेली ही वाढ लक्षवेधी ठरली असून त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

बिअर विक्रीतील वाढीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातही वाढ झाली आहे. विदेशी मद्याच्या किमतीत झालेली वाढ हे बिअर विक्री वाढण्यामागील आणखी एक कारण आहे. जुलै २०२५ मध्ये विदेशी मद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेक ग्राहक बिअरकडे वळल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. या बदलामुळे २०२६ मध्ये विदेशी मद्याच्या विक्रीत १३ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल महिन्यात विदेशी मद्य विक्रीत १६ टक्के, तर मे महिन्यात २० टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
डॉ. विठ्ठल भुकन, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'