जालना : इतर मागासवर्ग वर्गवारीतून मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ पासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मंगळवारी येथे केली. निदर्शनाच्या ठिकाणी मराठा समाजाने मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे वार्ताहरांशी ते बोलत होते. कोणीही घरात बसू नका, सर्वांनी अंतरवाली सराटी येथे या आणि आपली सामूहिक ताकद दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारकडून फसवणूक
सरकारने आमची फसवणूक केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सरकारला सोडणार नाही. असे स्पष्ट करून जरांगे यांनी, सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप केला. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे त्यांचे स्वागत आहे. कोणावरही सक्ती अथवा दबाव नाही, असेही ते म्हणाले. सगेसोयरे अधिसूचनेसह न्या. (निवृत्त) संदीप शिंदे समितीच्या कामाला चालना द्यावी आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.