जव्हारमध्ये मोठे भूस्खलन; सततच्या घटनांमध्ये वाढ, लोकवस्ती नसल्याने अनर्थ टळला 
महाराष्ट्र

जव्हारमध्ये मोठे भूस्खलन; सततच्या घटनांमध्ये वाढ, लोकवस्ती नसल्याने अनर्थ टळला

मुसळधार पाऊस आणि गेल्या काही महिन्यांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Swapnil S

जव्हार : मुसळधार पाऊस आणि गेल्या काही महिन्यांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपटाळे धरणाजवळ डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने सुमारे २०० मीटर रस्ता वाहून गेला असून, प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला.

राज्यमार्ग क्रमांक ७७ ते खडखड, कुंडाचा पाडा, आपटाळा, अळीवमाळ आणि आखरसाकूर या भागांना जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०७ वरील आपटाळा परिसरात २५ जुलैच्या रात्री भूस्खलन झाले. डोंगरावरील सुमारे २० मीटरहून अधिक उंचीवरील माती आणि दगड कोसळल्याने रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला असून, तेथे आठ ते दहा मीटर खोल दरी निर्माण झाली आहे.

कोसळलेली माती आणि दगड आपटाळे धरण परिसरात साचल्याने धरणाकडे जाणारा मुख्य रस्ता तसेच दोन अंतर्गत मार्ग बाधित झाले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, आपटाळे येथून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना झाप-जव्हार या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डोंगरावरील उर्वरित भागाला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. साचलेली माती हटविताना पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने तातडीने काम सुरू करणे धोकादायक ठरत आहे.

जामसर मार्गावरही धोका कायम

सेलवास-जामसर-वावर या राज्यमार्ग क्रमांक ७२ वरही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांच्या आधारभिंतींचे नुकसान झाले असून, वावर गावाजवळ मुख्य रस्त्याच्या मध्यभागी सुमारे साडेतीन फूट खोल भेग पडली आहे. त्यामुळे सध्या एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू असून, दुरुस्तीचे नियोजन करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे डोंगर उतार कमकुवत

गेल्या काही महिन्यांपासून जव्हार परिसरात सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यातच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतार कमकुवत झाल्याने यंदा भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी