कराड अपघातप्रकरणी पीडित कुटुंबाला १ कोटीची भरपाई; लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड 
महाराष्ट्र

कराड अपघातप्रकरणी पीडित कुटुंबाला १ कोटीची भरपाई; लोकन्यायालयात ऐतिहासिक तडजोड

कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघात प्रकरणात लोकन्यायालयाच्या माध्यमातून पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दोन्ही पक्षकारांमध्ये परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्यपूर्ण चर्चेनंतर ही तडजोड पूर्ण झाली असून लोकन्यायालयाने त्यावर आपल्या निर्णयाची मोहोर उमटविली.

Swapnil S

कराड : कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघात प्रकरणात लोकन्यायालयाच्या माध्यमातून पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दोन्ही पक्षकारांमध्ये परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्यपूर्ण चर्चेनंतर ही तडजोड पूर्ण झाली असून लोकन्यायालयाने त्यावर आपल्या निर्णयाची मोहोर उमटविली.

एखाद्या अपघातप्रकरणी इतकी भरीव आर्थिक नुकसानभरपाई मिळण्याची ही अनेक वर्षांनंतरची दुर्मिळ घटना मानली जात आहे. या भरघोस विमा रकमेच्या मंजुरीमुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयात खऱ्या अर्थाने न्याय मिळतो, याचा आज अनुभव आला, अशी भावना पीडित अर्जदारांनी व्यक्त केली. एकाच प्रकरणात १ कोटी रुपयांची अपघात भरपाई मंजूर होणे, ही घटना कराड लोकन्यायालयाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली असून लोकन्यायालयाच्या प्रभावी भूमिकेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी व डी. बी. पतंगे, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. गोवेकर यांनी प्रभावी मध्यस्थीची भूमिका बजावली.

अर्जदारांच्या वतीने ॲड. निरज फिरंगे, ॲड. अजिंक्य डुबल, ॲड. मच्छिंद्र पवार, ॲड. यशवंतदत्त बेंद्रे व ॲड. ऋषिकेश यादव यांनी बाजू मांडली, तर विमा कंपनीकडून ॲड. एस. एस. फडतरे यांनी काम पाहिले.

हा निकाल मोटार अपघात दाव्यांबाबत लोकन्यायालय हे वेगवान, परिणामकारक व न्याय्य पर्याय ठरू शकते, याचे ठोस उदाहरण मानले जात असून कायदेशीर व सामाजिक क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

संवेदनशील न्यायदानाचा अनुभव

यावेळी संबंधित कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले असून संपूर्ण वातावरण भावूक झाले होते. जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी स्वतः पुढाकार घेत कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यापुढील आयुष्य सकारात्मकतेने व धैर्याने जगा, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. न्यायदान करताना गंभीर व कठोर भासणाऱ्या न्यायाधीशांचे हे संवेदनशील रूप उपस्थितांच्या मनाला भावून गेले.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप