कराड : पाटण तालुक्यातील कोयना विभागातून जात असलेला गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाजेगाव नजीकच्या पुलाच्या कामाच्या ठिकाणचा पर्यायी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने कोकणाला जोडणारा महत्त्वाचा कराड - चिपळूण दरम्यानचा बंद महामार्ग बुधवारी दुपारपासून पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावरून अवजड वाहनांची चाचणी घेऊन मगच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल दोन-तीन दिवस ठप्प वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान पाटण ते संगमनगर धक्का (कोयना) या रस्त्यावर अनेक ठिकाणी अशा पद्धतीची धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने ऐन पावसाळ्यात तेही रात्रीच्या वेळेस येथे वाहनधारक व प्रवाशांसाठी धोकादायक परिस्थिती लक्षात घेता यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. दुर्दैवाने दुर्लक्षितपणामुळे जर भविष्यात अपघातात व कोणताही अनुचित प्रकार घडल्यास या संबंधित प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे, अशा संतप्त मागण्या देखील स्थानिकांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकण असा प्रवास करणाऱ्या प्रवास प्रवासी व वाहनधारकांमधून उमटत आहेत.
मागील दोन दिवसात अतिवृष्टीमुळे पाटण कोयना या मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. या दरम्यान संगमनगर - मणेरी - नेरळे या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. सोमवारी मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण राज्यमार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल (पर्यायी रस्ता) मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. त्यामुळे प्रशासनाने कराड-चिपळूण महामार्गारील वाहतूक बंद ठेवली आहे. हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी महामार्गा प्रशासन प्रयत्न करत होते. वाजेगावजीक वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्यानजीक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून सध्या हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. जेसीबी आणि पोकलँडच्या साह्याने महामार्गावरील वाजेगाव, शिरळसह अन्य ठिकाणचे रस्ते, भराव तसेच ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे धोका,अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणची धोकादायक वळणे, अडचणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबुतीकरणाचे काम सुरू होते.
पावसाळ्यात खबरदारी घेण्याची मागणी
बुधवारी अवजड वाहनांची चाचणी घेऊन दुपारनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाच्यावतीने उप विभागीय अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, उप विभागीय अधिकारी पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्यासह स्थानिक कोयनानगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून व अवजड वाहनांची चाचणी घेतल्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात याची अधिकाधिक खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.