कर्जतमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; विजेच्या ठिणगीने मच्छरदाणी पेटली 
महाराष्ट्र

कर्जतमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; विजेच्या ठिणगीने मच्छरदाणी पेटली

कर्जत शहरातील गुरुनगर परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या एका तासात तब्बल ११२ मि.मी. पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Swapnil S

कर्जत : कर्जत शहरातील गुरुनगर परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या एका तासात तब्बल ११२ मि.मी. पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर विजेची उपकरणे निकामी झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला आणि ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. गुरुनगर येथील श्रीराम फाटक यांच्या घराच्या खिडकीजवळ विजेची ठिणगी पडल्याने खिडकीला लावलेली मच्छरदाणी पेटली. ही बाब मंजिरी फाटक यांच्या लक्षात येताच त्यांनी श्रीराम फाटक यांना माहिती दिली. त्यांनी प्रसंगावधान राखत बादल्यांनी पाणी टाकून आग विझवली. घरात वयोवृद्ध महिला असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाले. इंदिरानगर वसाहतीतील काही घरांमध्ये पाणी शिरले. तसेच कर्जत येथील बंटी लोवन्सी यांच्या सायबर कॅफेमधील सर्व उपकरणे जळाल्याने आर्थिक नुकसान झाले. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच अनेक रस्त्यांवर अर्धा ते एक फूट पाणी साचल्याने नागरिकांनी हा पाऊस ढगफुटीसदृश असल्याचे सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

साबण, शाम्पू आणि टूथपेस्टवर आता 'शाकाहारी', 'मांसाहारी' चिन्ह अनिवार्य; केंद्र सरकारचा नवा नियम

Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Mumbai : 'गॅलॉप्स' सह ५ रेस्टॉरंट्सचे परवाने केले निलंबित

फाळके पुरस्काराने अनंत नाग सन्मानित; कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते, यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण