Photo : X (@CMOMaharashtra)
महाराष्ट्र

कोल्हापूरला लवकरच खंडपीठाचा दर्जा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आश्वासन; सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर सर्किट बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायदानाचे कार्य व्हावे. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची दीर्घ काळापासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून कोल्हापूरमध्ये लवकरच हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन होईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायदानाचे कार्य व्हावे. पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची दीर्घ काळापासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून कोल्हापूरमध्ये लवकरच हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन होईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन रविवारी सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे हे उपस्थित होते.

सरन्यायाधीशांनी सांगितले की, “न्याय मिळविण्याचा हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. न्याय देण्याची प्रक्रिया सर्वांसाठी सहजसोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे हेच न्यायव्यवस्थेचे कर्तव्य आहे.”

‘सीपीआर’च्या समोर असणाऱ्या या सर्किट बेंच इमारतीसाठी ४६ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्यावतीने मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यांच्या समन्वयातून येथील इमारतींचे व या परिसराचे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे.

‘हेरिटेज वास्तू’ला नवी झळाळी

‘सीपीआर’समोर असणारी जिल्हा न्यायालयाची इमारत सन १८७४ मध्ये बांधण्यात आली. जिल्हा न्यायालयाचा परिसर साधारण ४२०० चौरस फूट क्षेत्र आहे. कसबा बावडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी इमारत स्थलांतरीत झाल्यामुळे ही इमारत बंद होती. परंतु काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते. या मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करुन याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज होत आहे. न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळाली आहे.

कामकाजाची वेळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळ निश्चित झाली आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत पहिले सत्र दुपारी १.३० ते २.३० मधली सुट्टी व त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत दुसरे सत्र सुरु राहील.

ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेने पाऊल

कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर होऊ शकणार आहे. यामुळे वकिलांना, फिर्यादींना आणि सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.

नागरिकांमध्ये उत्सुकता

या घोषणेनंतर कोल्हापूर आणि परिसरातील वकील संघटना, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरचे न्यायनगरी होण्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावरआहे.

पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची सोय

या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल. या सर्किट बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत होईल. शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकास साधला जाईल. या सर्किट बेंचमुळे कायद्याचे अभ्यासक, वकिल व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील.

पावसाचा रुद्रावतार! मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी; वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त, रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

वाहतूककोंडीत अडकल्यावर प्रवाशांनी टोल का द्यावा? सर्वोच्च न्यायालयाने NHAI ला खडसावले

SIR हे मतचोरीचे नवे हत्यार - राहुल गांधी

CEC भाजपच्या प्रवक्त्यांसारखे काम करतात! विरोधकांचा हल्लाबोल

राधाकृष्णन यांनी घेतली मोदींची भेट