कराडच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ ते २२ मे उमेदवारी अर्ज; २१ जूनला मतदान, २३ जूनला मतमोजणी 
महाराष्ट्र

कराडच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ ते २२ मे उमेदवारी अर्ज; २१ जूनला मतदान, २३ जूनला मतमोजणी

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या कृष्णाकाठच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.

Swapnil S

कराड : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या कृष्णाकाठच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कराडच्या सहकारी संस्थांच्या जिल्हा सह-उपनिबंधक अपर्णा यादव यांनी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला.

जाहीर कार्यक्रमानुसार, येत्या १८ ते २२ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून, २१ जून रोजी मतदान तर २३ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या घोषणेनंतर कृष्णाकाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या या साखर कारखान्याची निवडणूक राज्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. सहकार आणि राजकारणाचा संगम असलेल्या या निवडणुकीत बदलणारी समीकरणे आणि गटबाजी राज्यभर लक्ष वेधून घेत असते.

कारखान्याच्या २०२१ मधील निवडणुकीवेळी सुमारे ४७ हजार १४५ सभासद होते. यंदा ही मतदारसंख्या वाढून ५० हजार २५२ इतकी झाली आहे. २०२१ च्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने २१ पैकी सर्व २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.

त्यांच्या विरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल असे दोन स्वतंत्र गट मैदानात उतरले होते. त्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावर एकमत न झाल्याने विरोधकांची आघाडी तुटली होती. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी संस्थापक पॅनेलला, तर आमदार विश्वजीत कदम यांनी रयत पॅनेलला पाठिंबा दिला होता.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भोसले गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून विरोधी अविनाश मोहिते गटही सक्रिय झाल्याने कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये