कराड : कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा नदी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह अखेर रविवारी सकाळी चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आढळून आला. प्रियांनी महेश कुंभार असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रियांनी कुंभार हिने नवीन कृष्णा पुलावरून नदीत उडी घेतली होती. पुलावरील कठड्याजवळ तिची चप्पल व एक बॅग आढळून आल्याने नागरिकांनी तातडीने कराड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्याने दिवसभर नदीपात्रात शोधमोहीम राबवली; मात्र त्या दिवशी युवतीचा शोध लागला नाही. त्यानंतर कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. सलग दोन दिवस प्रयत्न करूनही मृतदेह आढळून न आल्याने शनिवारी सांगली येथील आयुष हेल्पलाइन टीमला पाचारण करण्यात आले.
शनिवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र अंधार पडल्याने ती थांबवावी लागली. रविवारी, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीपात्रात प्रियांनी कुंभार हिचा मृतदेह आढळून आला. या शोधमोहिमेत कराड अग्निशमन दलाचे कर्मचारी श्रीकांत देवघरे, विक्रम जाधव, विठ्ठल डगळे, विशाल भिसे व योगेश पवार, तसेच सावळ्या ग्रुपचे सागर जावळे व भारत जावळे यांनी सहभाग घेतला.