मुंबई : कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाइफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. ५० खोल्यांचे हे हॉटेल २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, यासंदर्भातील करार मंत्रालयात करण्यात आला.
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेलसाठी ‘स्टार्टर बिल हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ आणि ‘राजस्केप हॉटेल्स प्रा. लि.’ यांच्यात करार झाला. यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे, रोहन रानडे, डॉ. निलेश बानवलीकर आणि अॅड. श्रीपाद महाजन उपस्थित होते. कुणकेश्वर येथे साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. अवघ्या २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वरला आता जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची नवी जोड मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
समुद्रकिनारा, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक पर्यटन अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या देवगड तालुक्यात जागतिक दर्जाचे हॉटेल उभारले जाणार असल्याने देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार निवास आणि आतिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. पर्यटनाशी संबंधित विविध क्षेत्रांना चालना मिळाल्यास त्याचा व्यापक आर्थिक परिणाम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊन दरडोई उत्पन्नवाढीलाही हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटनपूरक व्यवसायांना संधी
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्स ब्रँडचे हॉटेल उभारले जाणार असल्याने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आतिथ्य क्षेत्राचा विस्तार होणार आहे. पर्यटन वाढीसोबतच हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, सेवा व्यवसाय तसेच अन्य पूरक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कोकणातील निसर्गसंपदा, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि स्थानिक संस्कृतीला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या आणि दर्जेदार नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या शिखरावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये कुणकेश्वर येथील हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल.नितेश राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री सिंधुदुर्ग