महाराष्ट्र

"क्या हुआ तेरा ‘दादा’?", 'तो' व्हिडिओ शेअर करत शरद पवार गटाकडून अजित पवारांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

Rakesh Mali

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही गटांमध्ये सुरु झालेले आरोप-प्रत्यारोप आणि टीका अजूनही थांबताना दिसत नाहीत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार यांच्या जुन्या वक्तव्यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांना खिंडीत गाठायचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

क्या हुआ तेरा दादा?

या व्हिडिओला "क्या हुआ तेरा दादा?" असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच, "फडणवीसांवर एकेकाळी हटकून टीका करणारे दादा, भाजपच्या फसवेगिरीचे वाभाडे काढणारे दादा, आज दादांनाच विचारायची पाळी आली आहे, हे काय करून घेतलंत दादा!", असे म्हणत अजित पवारांना डिवचण्यात आले आहे. तसेच, "महाराष्ट्रातील जनता इमानदारांच्या आणि निष्ठावंतांच्या पाठीशीच कायम उभी राहिली आहे, हा इतिहास आहे!" असे म्हणत बंडखोरी केलेल्यांना जनता धडा शिकवेल, असा संदेश देण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत सुरुवातीलाच "आता नको ही कमळाबाई" हे गाणे ऐकू येते. याचबरोबर व्हिडिओमध्ये "माजी टीकाकार प्रस्तुत, नको नको ही कमळा बाई", असे लिहिण्यात आले आहे. तसेच, या व्हिडिओत अजित पवार देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत. "माझ्याच बारामतीच्या परिसरात येऊन धनगर समाजाला त्यांनी (फडणवीसांनी) आश्वासन दिले. आमचे सरकार आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आता देवेंद्र फडणवीस कुठे गेले की त्या भागामध्ये गाणे लावले जाते, क्या हुआ तेरा वादा?", अशा शब्दात अजित पवार फडणवीसांवर हल्ला चढवताना दिसत आहेत.

याचबरोबर, "जाणीवपूर्वक जातींमध्ये, पंतामध्ये, धर्मामध्ये अंतर पाडण्याचे काम, त्याच्यामधून स्वत:ची राजकीय पोळी भाजता येईल का? अशा प्रकारचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करतंय", अशी टीकाही अजित पवार या व्हिडिओत करत आहेत. तसेच, व्हिडिओच्या शेवटी अजित पवार हे "कमळाबाई, कमळाबाई", असे म्हणतात आणि नंतर "आली आली ही कमळाबाई हिने महागाई वाढवली बाई", हे गाणे वाजते. यावेळी अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान, शरद पवार गटाने केलेल्या या टीकेला अजित पवार गटाकडून कशाप्रकारे उत्तर मिळते हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस