'माधुरी' हत्तीणीचे संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

उपचारानंतर 'माधुरी' हत्तीण कोल्हापूरला परतणार; गंभीर दुखापतींवर मात करत तब्येत सुधारली

रिलायन्स फाऊंडेशनच्या ‘वनतारा’ उपक्रमामध्ये गेल्या वर्षभरापासून उपचार घेत असलेली ‘माधुरी’ हत्तीण आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे. ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल झालेल्या माधुरीला पायांच्या गंभीर दुखापती, अनेक फ्रॅक्चर तसेच स्नायू आणि त्वचेचे नुकसान झाल्याने दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता होती.

Swapnil S

मुंबई : रिलायन्स फाऊंडेशनच्या ‘वनतारा’ उपक्रमामध्ये गेल्या वर्षभरापासून उपचार घेत असलेली ‘माधुरी’ हत्तीण आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन कोल्हापूरला परतण्यास सज्ज झाली आहे. ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल झालेल्या माधुरीला पायांच्या गंभीर दुखापती, अनेक फ्रॅक्चर तसेच स्नायू आणि त्वचेचे नुकसान झाल्याने दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता होती.

वनतारामधील पशुवैद्यक, जीवशास्त्रज्ञ, प्राणी कल्याण अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि हत्तींच्या संगोपनातील तज्ज्ञांच्या पथकाने तिच्यासाठी सर्वंकष उपचार आराखडा तयार केला. गेल्या वर्षभरात नियमित वैद्यकीय तपासण्या, रेडिओग्राफिक चाचण्या, विशेष व्यायाम आणि हायड्रोथेरपीच्या माध्यमातून तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

तिच्या पायांतील फ्रॅक्चर भरून आले असून हाडांची रचना स्थिर झाली आहे. जखमा आणि स्नायूंना झालेली अंतर्गत हानीही मोठ्या प्रमाणात भरून आली असून, ती आता स्वतःच्या शरीराचे वजन व्यवस्थित पेलू शकत असल्याचे वैद्यकीय तपासण्यांतून स्पष्ट झाले आहे.

माधुरीच्या उपचारांमध्ये पायांची विशेष निगा, नियमित रेडिओग्राफिक तपासण्या, सांधे आणि हाडे मजबूत करण्यासाठी व्यायाम, तसेच हायड्रोथेरपीचा समावेश होता. तिला दररोज सुमारे १८० किलो ताजे हिरवे गवत, फळभाज्या, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अन्य पूरक आहार देण्यात आला. शारीरिक उपचारांबरोबरच तिच्या वर्तनामध्ये आणि मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी तिला जंगलात फिरविणे, धुळीचे स्नान आणि चिखलातील हालचाली अशा विविध उपक्रमांवर भर देण्यात आला.

दीर्घकालीन पशुवैद्यकीय देखरेखीची आवश्यकता

माधुरीला कोल्हापूरला परत पाठविण्यात येणार असले तरी तिच्या पायांच्या हाडांची पूर्वीची गंभीर अवस्था लक्षात घेता तिला दीर्घकालीन पशुवैद्यकीय देखरेखीची आवश्यकता कायम राहणार आहे. नियमित रेडिओग्राफिक तपासण्या, पायांची निगा आणि पोषक आहाराच्या साहाय्याने तिचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रिलायन्स फाऊंडेशनचा ‘वनतारा’ हा उपक्रम संकटात सापडलेल्या वन्यजीवांचे रक्षण, उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असून, आधुनिक पशुवैद्यकीय शास्त्राच्या साहाय्याने प्राण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी