मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मतदानाच्या टक्केवारीपेक्षा आता शुक्रवारी सकाळी निकाल काय लागणार, याकडे राज्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रावर उत्साहात मतदान सुरू झाल्याचे चित्र दिसले. त्यानंतर १० वाजता थोडी गर्दी कमी झाल्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून पुन्हा एकदा सगळीकडे मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसले. मात्र, मुंबईत काही नागरिकांच्या बोटावरील मार्कर पेनने लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
काही नागरिकांनी शाई पुसत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसह निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. मात्र निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. “शाई लावल्यानंतर १५ ते २० सेकंद ठेवून सुकल्यानंतर शाई पुसली जात नाही,” असे स्पष्टीकरण आयोगाने दिले.
बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला.
दुबार मतदारांचा गोंधळ
दुसरीकडे, दुबार मतदारांची नावे वगळल्याचा दावा प्रशासन आणि आयोगाकडून करण्यात आला असला तरी अनेक दुबार नावे मतदार यादीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले तसेच काही ठिकाणी दुबार मतदारांनी मतदान केल्याच्या तक्रारी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी केल्या. अनेकांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यावर ही केवळ आयोगाचीच नाही तर नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. आपले नाव मतदार यादीत आहे का नाही, हे तपासून घेण्याची नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार उघडकीस आले. यावर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील १० वर्षात राज्य निवडणूक आयोगाने एकही ईव्हीएम मशीन खरेदी केले नसल्याचे सांगत ईव्हीएम मशीन जुन्या झाल्याने काही ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे मान्य केले. तसेच ज्या ठिकाणी मशीन्स बंद पडले आहेत, त्या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली आहे, हेसुद्धा स्पष्ट केले. असे असले तरी काही अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडल्याचे चित्र दिसले. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीच्या महानिकालाकडे लक्ष लागले आहे.
राज्यात दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ४२ टक्के मतदान
राज्यातील २९ महापालिकांसाठी सुमारे साडेतीन कोटी मतदारांची नोंदणी झाली होती. सकाळपासूनच दिवसभर मोठ्या उत्साहात मतदान झाल्याचे चित्र दिसले. मात्र, राज्यात सर्व महापालिकेत सरासरी किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी आयोगाकडून उपलब्ध झाली नव्हती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४२ टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपताच २९ महापालिकातील १५ हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, मतदानाची अंतिम आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.