मुंबई : राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पूरस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडल्याने तो सध्या सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे, २५३ तालुक्यांना फटका बसला असून ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
६० हजार शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून त्यांना माती आणण्यासाठी राज्य सरकार ४७ हजार रुपये, तर ‘नरेगा’अंतर्गत ३ लाख असे एकूण हेक्टरी ३ लाख ४७ हजार रुपये रोख पैसे देण्यात येणार आहेत. तसेच बाधित झालेल्या प्रत्येक विहिरीसाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहेत. एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता, थेट बँक खात्यात ही मदत जमा होणार आहे. एकूणच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान, घरांची पडझड, जमीन खरडून गेली, दुकानदार, गोठ्याचे नुकसान, जनावरे दगावली. अतिवृष्टीमुळे १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेक जण दगावले असून घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे याला प्राधान्य देण्यात आले असून घरांची पडझड झाली, पुराचे पाणी घरात शिरले अशा लोकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून १० हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात आली आहे. तसेच २,२१५ कोटी रुपयांची मदत याआधीच जाहीर केली आहे.
गहू तांदूळ, अन्नधान्याचे पॅकेटचे वाटप करण्यात आले असून शेतकऱ्यांना उभे करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे घरांची पूर्णतः पडझड झाली असेल तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नव्याने घरांची बांधणी करुन देण्यात येणार आहे. डोंगर भागातील घरांची पडझड झालेल्यांना १० हजार रुपये रोख देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा २९ जिल्ह्यांना बसला असून परभणी, वाशिम, जालना, यवतमाळ या जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. तर संभाजीनगरमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक नुकसान आहे, तर सोलापूर धाराशिवमध्ये ८० टक्क्यांहून अधिकचे नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास १८ हजार कोटींपेक्षा अधिक पैसे ‘क्रॉप कम्पेन्शेसन’मधून देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
चार विभागातील खर्च कमी करू
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे याला प्राधान्य दिले असून आतापर्यंत हे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे एखाद्या विभागातील खर्च कमी करू, पण शेतकऱ्यांना आधी मदत करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
४५ हजार शेतकऱ्यांचा विमा
राज्यातील ४५ हजार शेतकऱ्यांची विमा पॉलिसी असून १७ हजार रुपये हेक्टरीनुसार विम्याचे पैसे मिळतील. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळावे, यासाठी योग्य ती कार्यवाही पूर्ण करा, विमा कंपन्यांवर दबाव आणत शेतकऱ्यांना लवकर मदत देण्यास सांगू, असे केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आश्वासित केल्याचे ते म्हणाले.
मत्स्यशेतीसाठी १०० कोटींची नुकसानभरपाई
अतिवृष्टीचा फटका मत्स्य व्यवसायालाही बसला असून त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पायावर उभे करणे महत्त्वाचे - फडणवीस
“महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आता पुढच्या रब्बी हंगामाचेही पिक घेता येणार नाही. मात्र, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी निर्णय घेतला आहे. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
वाटाण्याच्या अक्षता - सकपाळ
ही मदत म्हणजे शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यासारखे आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे अपेक्षित असताना, तसेच हेक्टरी ५० हजारांची मागणी असताना दिलेली मदत अत्यल्प आहे. पंजाब आणि कर्नाटक सरकार अनुक्रमे ५० हजार आणि लाख रुपयांपर्यंत मदत देऊ शकतात, मग महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना सरकारच्या हाताला कंप का येतो? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
ही शेतकऱ्यांची थट्टा - वडेट्टीवार
महायुती सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना, फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत मदत जाहीर केली. ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच केली, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
तोंडाला पाने पुसली - रोहित पवार
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला या सरकारने पद्धतशीरपणे बगल दिली, तसेच अतिवृष्टीने पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला हात देण्यासाठी हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी एनडीआरएफच्या निकषानुसारच तुटपुंजी मदत जाहीर करुन तोंडाला अक्षरश: पाने पुसली. राणा भीमदेवी थाटात ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली. पण त्याचा हिशोब केला, तर शेतकऱ्यांचा झालेला खर्चही वसूल होणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
अशी मिळणार मदत
दुधाळ जनावरांना ३७ हजार रुपयांपर्यंत मदत
गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार
कुक्कुटपालनाला १०० रुपये प्रति कोंबडी
नष्ट, पडझड झालेली घरे बांधण्यासाठी १० हजार
डोंगरी भागातील घरांना १० हजारांची अधिकची मदत
झोपड्या, गोठा, दुकानदार यांना ५० हजारांची मदत
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार
शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये
हंगामी बागायती शेती नुकसानभरपाई हेक्टरी २७ हजार रुपये
बागायती शेती नुकसानभरपाई - हेक्टरी ३२ हजार रुपये
विमाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार रुपये
कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार
बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना ५० हजारांहून अधिक मदत मिळेल
खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर रोख तसेच ३ लाख रुपये हेक्टरी ‘नरेगा’अंतर्गत मदत