महाराष्ट्र

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

Maharashtra assembly elections 2024: राज्याच्या सत्तेचे सिंहासन पुढील पाच वर्षे कुणाच्या हाती जाणार याबाबत कोणताही अंदाज बांधता न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान काही किरकोळ हिंसक घटना वगळता शांततेत पार पडले. राज्यात गेल्या अडीच वर्षात झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याला नवी दिशा देणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे अस्तित्वही पणाला लागले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या सत्तेचे सिंहासन पुढील पाच वर्षे कुणाच्या हाती जाणार याबाबत कोणताही अंदाज बांधता न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान काही किरकोळ हिंसक घटना वगळता शांततेत पार पडले. राज्यात गेल्या अडीच वर्षात झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याला नवी दिशा देणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे अस्तित्वही पणाला लागले आहे. त्यामुळे मतदारराजाची कुणावर कृपा होणार याबाबत सर्वत्र प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या महासंग्रामाचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, राज्यात सरासरी ६० टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत झाले. तर आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात कमी ५१.४१ टक्के मतदान झाले.

राज्यातील २८८ मतदारसंघात तब्बल ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. प्रचाराच्या तोफा धडाडल्या, रॅली, सभा झाल्या. अखेर महिनाभरानंतर बुधवारी मतदान काही हिंसक घटना वगळता शांततेत पार पडले.

बीड विधानसभा मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर धुळ्यातील एका पोलिंग बुथवर भाजप व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.

बॉलिवूड स्टार शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर यांच्यासह उद्योग, कला क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी मतदानात उत्साहाने भाग घेतला. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या असून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ता हातून निसटू नये म्हणून महायुतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ‘लाडक्या’ योजना राज्यात लागू केल्या आहेत. त्याचा त्यांना किती लाभ होणार हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

या दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद

बुधवारी झालेल्या मतदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, युगेंद्र पवार, सदा सरवणकर, नवाब मलिक, नितेश राणे, निलेश राणे, समीर भुजबळ आदींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

मुंबईत सरासरी ५१.४१ टक्के मतदान

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सरासरी ५१.४१ टक्के मतदान झाले. मुंबई शहरात ४९.०७ टक्के, तर मुंबई उपनगरांमध्ये ५२.६७ टक्के मतदान झाले. मुंबईतील मतदान बव्हंशी शांततेत आणि वेगाने तसेच सुव्यवस्थितपणे पार पडले. मुंबईत शहराच्या तुलनेत उपनगरात मतदारांचा उत्साह अधिक दिसून आला. मुंबई उपनगरात भांडूपमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे ६०.१८ टक्के मतदानाची नोंद झाली होती, तर सर्वात कमी मतदान कुलाब्यात ४१.६४ टक्के झाले.

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ

अर्जेंटिनाच्या मेस्सीची पुढील वर्षी भारतवारी; केरळमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी संपूर्ण संघासह येणार