संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १३ ठिकाणी सभा होणार असून मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे, नवी मुंबई यासह अन्य शहरांमध्ये या जाहीरसभा होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : महायुतीत २७७ जागांचे वाटप एकमताने ठरले असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद करण्यात येतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजपची दुसरी व तिसरी यादी केंद्रीय संसदीय मंडळ जाहीर करणार आहे. भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय संसदीय मंडळाच्या विरुद्ध जाऊन नामांकन अर्ज दाखल करू नये, असेही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना बजावले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात कोणतीही जागा मागितली नाही. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या संपर्कात आहेत. जिल्ह्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्याशी समन्वय साधून असून योग्य निर्णय घेण्यात येईल. नागपूर शहरात प्रत्येक जागेसाठी ५ ते ८ नावे पक्षाकडे आली आहेत. त्याबाबत निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेईल, असे त्यांनी सांगितले.

मोदींच्या १३ ठिकाणी सभा

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १३ ठिकाणी सभा होणार असून मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे, नवी मुंबई यासह अन्य शहरांमध्ये या जाहीरसभा होतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राजू तोडसाम, उमेश यावलकर यांची घरवापसी

आर्णी विधानसभा मतदासंघातील माजी आमदार राजू तोडसाम, मूर्तीजापूर विधानसभा क्षेत्रातील नेते रवी राठी यांनी भाजप प्रवेश केला. त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून यावेळी स्वागत करण्यात आले. अमरावती जिल्हा उपाध्यक्ष तसेच मोर्शी विधानसभेचे भाजप नेते उमेश यावलकर यांनी दिलेला राजीनामा परत घेतल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. या पक्षप्रवेशाने भाजप संघटन मजबूत होणार असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस, आशीष शेलार यांचे उमेदवारी अर्ज

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. तर भाजपचे आमदार व मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. फडणवीस यांनी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देत आशीर्वाद घेतला.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड' वैध नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल