पुणे : काही राजकीय पक्ष मतांसाठी बनवाबनवी करायला लागले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांना ते फसवत आहेत. महिलांना आमच्या सरकारने दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आमच्यावर टीका झाली. आता हे तीन हजार रुपये देऊ, चार हजार रुपये देऊ आणि अजून काही मोफत देऊ, अशी धादांत खोटी आश्वासने देत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केला. तसेच राज्याच्या सात लाख कोटींच्या अर्थसंकल्पातील पाच लाख कोटी या खोट्या आश्वासनात संपतील, मग मविआ विकासासाठी पैसा कुठून आणणार? असा सवालही त्यांनी केला.
महायुतीत दोन-तीन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होताना दिसत आहेत. अशा लढती कमी करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करीत होतो. काही ठिकाणी एबी फॉर्म राहिले आहेत. भोरमध्ये अधिकृत उमेदवार नाही, पण पुरंदरमध्ये अधिकृत उमेदवार आहे. श्रीरामपूर, सिंदखेड राजा आणि देवळालीमध्ये उमेदवार आहेत, याबद्दल आमची चर्चा झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज किंवा उद्या यातून मार्ग निघेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, त्याला म्हणावं तुमचं इंजिन आणि मनसे घेऊन बस ना बाबा, बाकीचं तुला काय करायचंय, आज लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो, पक्ष हा कुणाच्या एकट्याच्या मालकीचा नसतो, असे पवारसाहेब म्हणाले होते. पुढे कुणी ना कुणी पक्ष चालवत असतो, असे ते म्हणाले.
विनाशकाले विपरीत बुद्धी
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही त्यामुळे आक्रमक झाले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, त्यांनी काल जे काही वक्तव्य केलंय ते अतिशय निषेधार्ह आहे. मी तीव्र शब्दांत त्यांचा निषेध करतो. त्यासंदर्भात ट्विटसुद्धा केलंय. तसेच मी त्यांना फोन करून तुम्ही केलेले हे वक्तव्य आम्हाला कुणालाही आवडले नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तुम्ही हे बंद करा, वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे ती मांडा, तुमची विचारधारा आणि इतरांची विचारधारा वेगळ्या असू शकतात, मतमतांतरे असू शकतात, पण बोलत असताना ताळमेळ ठेवून बोललं पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ही निंदनीय घटना असून, विनाशकाले विपरीत बुद्धीसारखा प्रकार आहे. यापुढे असे होणार नाही, असे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीची वक्तव्यं महाराष्ट्र सहन करीत नाही आणि आम्हाला ते मान्य नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांवर टीका करताना त्यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी तुम्हा आक्षेप किंवा निषेध का केला नाही? मोदींच्या या वक्तव्याला विरोध का केला नाही, असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी त्यावर अजब उत्तर दिले. त्यावेळी पंतप्रधानांनी ‘भटकती आत्मा’ नेमके कोणाला डोळ्यासमोर ठेवून म्हटले होते. हे मला ताबडतोब कळले नव्हते. त्यामुळे मी ताबडतोब त्याबद्दल काही बोललो नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
नवाब मलिक यांचा प्रचार करणार
नवाब मलिक यांच्या प्रचाराला आपण जाणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार आपण करणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय राज्यात जास्तीत जास्त सभा घेण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी बारामतीत सभा घेणार नाहीत. ज्या ठिकाणी अधिक गरज असेल त्याच ठिकाणी मोदींच्या सभा होतील, असेही त्यांनी सांगितले. सध्या प्रचारात नुसतं खाऊ, भाऊ, माऊ असे सुरू आहे. असे करून कसे चालेल, असेही ते म्हणाले.
नवाब मलिक आमचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहे. त्यांच्यावर फक्त आरोप झालेत, ते सिद्ध झालेले नाहीत म्हणून त्यांना दोषी कसे ठरवता? उपमुख्यमंत्र्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार असल्याचे यावेळी अजित पवारांनी नमूद केले.