रोहित चंदावरकर/मुंबई
गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारकरिता खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरली. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठीच्या या थेट निधी हस्तांतरण योजनेमुळे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने यंदा विक्रमी यश मिळविले आहे.
महायुतीत काहीसे दुर्लक्षित करण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारकत घेतलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षापेक्षा ३५ जागा अधिक पटकावत चकित केले. महायुतीच्या पुनर्सत्तास्थापनेबाबत तसेच एक्झिट पोलचे सर्वच दावे या निकालाने फोल ठरविले.
विश्वसनीय सूत्रानुसार, नव्या सरकारमधील मुख्यमंत्रीपदावर भाजपने दावा केला असून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव या पदासाठी निश्चित करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भाजपच मुख्यमंत्रीपदावर दावा करेल, असे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याचे भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. याबाबत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही विश्वासात घेऊन महायुती सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याचे कळते.
महायुती सरकारने जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात समाजातील दुर्बल घटकातील महिला आणि शेतकऱ्यांसाठी थेट निधी हस्तांतरण योजना घोषित केली होती. त्याचा प्रत्यक्ष परिणाम भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने शनिवारी मिळविलेल्या यशातून दिसून येत असल्याचे मानले जाते. अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असतील हे मतदारांनी ठरवल्याचे या निकालातून स्पष्ट होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० च्या जवळपास म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा ३० च्या आसपास अधिक जागा मिळणे हे या निकालातील आश्चर्य आहे.
महाविकास आघाडीमध्ये (मविआ) सर्वाधिक जागा लढवूनही विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा ओलांडता न आल्याने काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला आहे. मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या महिला मतदारांच्या संख्येत ५.६% वाढ हे महायुतीसाठी गेमचेंजर ठरले. यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झाले. याचे श्रेय मोठ्या संख्येने मतदानाकरिता बाहेर पडलेल्या महिलांना जाते. सरकारने जाहीर केलेल्या योजनांकरिता लाभार्थी असलेल्या सर्व महिलांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला मतदान केले.
शनिवारच्या निकालातील दुसरा महत्त्वाचा घटक अर्थातच अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांच्या संख्येचा आहे. १७% मते अपक्ष उमेदवारांना गेल्याची ताजी आकडेवारी सांगते. मविआ अनेक उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत असणारा हा आणखी एक घटक असावा. अपक्ष तसेच बंडखोरांना आणि राज ठाकरेंच्या मनसेसारख्या छोट्या पक्षांना किती मते गेली हे समजायला थोडा वेळ लागेल, मात्र त्यामुळे महाविकास आघाडीचे नुकसान झाले असेल, हे स्पष्ट दिसते आहे
उद्धव, शरद पवारांबाबतची सहानुभूतीची लाट ओसरली
मविआसाठी यंदाची निवडणूक निराशाजनक ठरणारा आणखी एक घटक म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या मताचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळाला, तसा विधानसभेलाही मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जाहीर केलेल्या लाडकी बहीणसारख्या योजनेमुळे मतदार प्रभावित झाल्याचे दिसले..
महायुतीचा शपथविधी सोमवारी वानखेडेवर
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाला. त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण, याबाबत उद्या (सोमवार) दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडणार असून त्याची तयारी करण्याचे निर्देश महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या सोहळ्याला देशभरातील बडे नेते, अभिनेता, बड्या उद्योगपतींची उपस्थिती असणार आहे.