प्रकाश पवार
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) या तीन पक्षांच्या युतीचा निर्णायक विजय झाला आहे. दुसऱ्या शब्दात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. निवडणूक निकालामध्ये जवळपास ५०% मतदान युतीला झाल्याचे दिसते. भाजपला २५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना दहा ते बारा टक्के या दरम्यान मतदान झाले आहे. म्हणजेच थोडक्यात ५०% मतदान हिंदुत्व विचारांचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाला झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील हिंदुत्वाचा पुरस्कार करत होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दहा टक्के मते म्हणजेच जवळपास महाराष्ट्र ६०% हिंदुत्व या विचारप्रणालीने व्यापलेला दिसतो. महाराष्ट्रामध्ये निवडणूक राजकारणात हिंदुत्व ही विचारप्रणाली पंचवीस टक्क्यांच्या आसपास कृतिशील होती; परंतु या निवडणुकीत साठ टक्के इतकी व्याप्ती हिंदुत्व विचारप्रणालीने व्यापलेले आहे. मुख्य स्पर्धा हिंदुत्वाच्या विविध गटांमध्ये होती. तरीही हिंदुत्वाने प्रत्येक गटाशी जुळवून घेऊन एक प्रकारचा हिंदुत्व अंतर्गत एकोपा आणि ऐक्य घडविले.
पाच पदरी हिंदुत्व
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाच पदरी हिंदुत्व कृतिशील झाले होते. पाच प्रकारचे हिंदुत्व या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत होते.
भाजपचे हिंदुत्व हे मुख्य हिंदुत्व होते. भाजपच्या हिंदुत्वाला तीन वेगवेगळे कंगोरे होते. संघाचे हिंदुत्व, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे हिंदुत्व, सावरकरांचे हिंदुत्व असे एकूण तीन वेगवेगळे पदर निवडणूक प्रचारामध्ये प्रभावी ठरले होते. संघाच्या हिंदुत्वाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अदृश्यपणे कार्य केले. संघाच्या कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविली. तसेच संघाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांबरोबर जुळवून घेतले. त्यांनी भाजपची मते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न केले. हे त्यांचे काम यशस्वी झाल्यामुळे अजित पवार यांची मतांची टक्केवारी थेट दहा टक्क्यांच्या पुढे सरकली. अजित पवार यांना ११ टक्के मते आणि एकूण जागांपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकून आणता आल्या.
दुसऱ्या प्रकारचे हिंदुत्व नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केलेले होते. नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व ओबीसी वर्गाला एकत्रित ठेवत होते. ओबीसी वर्गाने त्यांचे हिंदुत्व मनोमन स्वीकारले होते. अमित शहा यांचे हिंदुत्व एका अर्थाने व्यापारी वर्गाने अति जलद गतीने आत्मसात केलेले हिंदुत्व होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा थोडे वेगळे होते. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि कुणबी या दोन्ही वर्गांना हिंदुत्व स्वीकारण्यास भाग पाडले होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक गुरू, सत्संग, धार्मिक संस्था यांचा देखील पाठिंबा भाजपला मिळत गेला. फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान मराठ्यांनी हिंदुत्व स्वीकारलेले आहे, असे देखील म्हटले होते. यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ओबीसी, मराठा-कुणबी आणि व्यापार उद्दीम करणारा वर्ग अशा तीन वेगवेगळ्या समाजांमधून हिंदुत्वाला प्रथम क्रमांक मिळत गेला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सावरकरवादी व्यक्ती, गट आणि संघटना आहेत. त्यांचे स्वरूप संघापेक्षा वेगळे आणि राजकीय हिंदुत्व यापेक्षा वेगळे आहे. सावरकरांचा विचार योगी आदित्य यांनी स्वीकारलेला आहे. यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रचार आजच्या संदर्भात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत केला. त्या हिंदुत्वाने देखील भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना प्रतिसाद दिला. यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी वाढत गेली.
एकनाथ शिंदे यांनी आध्यात्मिक हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यांनी दिघे यांच्या वरती दोन चित्रपटांची निर्मिती केली. त्या दोन्हीही चित्रपटांमधून त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार केला. याबरोबरच एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण समर्थक गटाने पाठिंबा दिला. यामुळे त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढत गेली. याबरोबरच मराठा वर्गामध्ये हिंदुत्वाबद्दल सौम्य आकर्षण होते. हा गट एकनाथ शिंदे यांच्याशी जोडला गेला. यामुळे मराठा जातीत हिंदुत्व निष्ठ म्हणून एकनाथ शिंदे या निवडणुकीतून पुढे आले.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय मैत्री केली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वाशी जुळवून घेतले होते. तसेच अजित पवार वेळोवेळी हिंदुत्वाबद्दल सौम्य भाषेत बोलत होते. संघाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पक्षाशी या विधानसभा निवडणुकीत जुळवून घेतले. त्यामुळे त्यांच्या पक्षाची मते १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली.
भाजप या पक्षाशी संबंधित पाच पदरी हिंदुत्व या निवडणुकीत कृतिशील झाले होते. या व्यतिरिक्त हिंदुत्वाचा सहावा घटक उद्धव ठाकरे हे होते. एका बाजूला पाच पदरी हिंदुत्व आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व असा हा संघर्ष झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ अकरा टक्के मते एकत्रित आली. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्व भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच भूमिपुत्र ही एक संकल्पना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची होती. ही त्यांची विचारप्रणाली या निवडणुकीमध्ये बरीच मागे पडलेली दिसते.
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रगती केली होती. महाविकास आघाडीमध्ये यानंतर अनेक नवीन समस्या निर्माण होत गेल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदान वाढले नाही. महाविकास आघाडीने मुख्य चार समस्या सोडविल्या नाहीत.
महाविकास आघाडीने हिंदुत्व या विचारांना पर्याय दिला नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ देवदर्शनापुरते मर्यादित हिंदुत्व मांडत होती. त्यांनी सहिष्णू हिंदू धर्म आणि सर्वधर्मसमभावी हिंदू धर्म या पातळीवर कोणताही कार्यक्रम दिला नाही. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांच्या मतदानाची टक्केवारी केवळ २३ टक्के इतकीच राहिली. म्हणजेच थोडक्यात हिंदुत्वाच्या व्यतिरिक्त केवळ २३ टक्के मते त्यांच्या वाट्याला आली. एका बाजूला ६० टक्के मते हिंदुत्वाची आणि दुसऱ्या बाजूला केवळ २३ टक्के मते हिंदुत्व व्यतिरिक्त असा हा विषम सामना या निवडणुकीत घडून आला.
लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना युतीने राबविली होती. दोन्ही काँग्रेस पक्षांना या योजनेचा प्रतिकार करता आला नाही. तसेच दोन्ही काँग्रेस पक्षांना या योजनेपेक्षा वेगळे धोरण आखण्याचा शब्द देता आला नाही. यामुळे लाडकी बहीण या योजनेने एका अर्थाने आघाडीला मुख्य स्पर्धेतून दूर केले. राज्यात महिला मतदारांची संख्या चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ होती. सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले होते. ही प्रक्रिया जनगणना परिसिमनानंतर घडणार आहे. त्या आरक्षणानुसार ९६ महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. दोन्हीही आघाड्यांनी प्रत्येकी ३० महिलांना उमेदवारी दिली. परंतु एकूण मोठे चित्र आणि जाहिरात भाजपचे महिलांचे समर्थन करणारी पुढे आली. या घटकामुळे आघाडी दोन पावले मागेच राहिली.
महाविकास आघाडीने मैत्रीपूर्ण लढती लढवल्या. उदाहरणार्थ पाटण, सांगली, सांगोला इत्यादी. काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्षाच्या विरोधात सोलापूरमध्ये भूमिका घेतली. यामुळे महाविकास आघाडीत ऐक्य व एकोपा दिसत नव्हता. त्यामुळे देखील मतदारांनी इलेक्ट्रोल मेरिट असलेले उमेदवार निवडले.
काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा आधीच सुरू झाली होती. यामुळे मुख्यमंत्रीपदाची चर्चा ज्या ज्या उमेदवारांची झाली. ते ते उमेदवार पराभूत झाले. शरद पवार यांनी जवळपास सर्व उमेदवार नवीन दिले होते. त्यांनीच घडवलेले प्रस्थापित उमेदवार अजित पवारांच्या पक्षाचे होते. यामुळे प्रस्थापित उमेदवार शरद पवारांच्या विरोधात लढत होते. शरद पवारांचा प्रत्येक डावपेच त्यांना माहीत होता. यामुळे शरद पवारांचे नवखे उमेदवार एका अर्थाने स्पर्धेत राहिले. मोठे यश पदरी आले नाही.
महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजकीय ताकद वाढली आहे. याबरोबरच महाराष्ट्रात वर्चस्वशाली भाजप हा पक्ष उदयाला आला आहे. भाजपवर संपूर्ण नियंत्रण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे राजकारण दिल्लीतून घडणार ही एक नवीन प्रक्रिया यातून स्वीकारली गेली आहे.