मुंबई/पुणे : मुंबई, पुणे, ठाणे परिसरात नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच हवामानात झपाट्याने बदल जाणवू लागले होते. आता थंडीचा कडाका कमी झाला असला तरी येत्या आठवड्यात थंडीची लाट पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात असलेला ढगाळपणा दूर होताच महाराष्ट्राला पुन्हा एकदा थंडीचा विळखा बसणार आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून, येत्या काही दिवसांत पारा कमालीचा घसरणार आहे.
थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. राज्यभरात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असला, तरी जानेवारीच्या पहिल्याच दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. मात्र आता पाऊस गायब झाला व थंडीचाही जोर काहीसा कमी झाला असला तरी थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोकण किनारपट्टीवर सकाळी धुके
येत्या आठवडाभरात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सकाळी धुके तर दिवसभर कोरडे वातावरण राहील. मुंबईप्रमाणेच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही हवामान कोरडे राहणार आहे. पुण्यातही पुढील आठवड्यात पहाटे धुके आणि गारवा जाणवेल, मात्र दिवसभर थंडीचा कडाका कमी होत जाण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नागरिकांना रात्री आणि पहाटे थंडी जाणवू शकते, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या काही भागांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून, त्यामुळे दृश्यमानता कमी होईल आणि रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
किमान तापमानात होईल घट
उत्तरेकडून येणारे थंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान यामुळे यंदा राज्यभरात डिसेंबरमध्ये थंडी अनुभवायला मिळाली होती. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील बाष्प वाढले आहे. त्यामुळे वर्षाअखेरीपर्यंत असलेली थंडी कमी झाली. तसेच पहाटेच्या सुमारास विरळ धुकेही पडू लागले होते. मात्र, ९ ते १५ जानेवारी या कालावधीत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे पुन्हा हवामान बदलून थंडी वाढण्याची चिन्हे आहेत.