मुंबई : राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता ३१ ऑक्टोबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना बसला आहे.
राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. महसूल व वन विभागाकडून प्राप्त अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून त्यापैकी १२ जिल्ह्यांत सरासरीच्या २०० टक्क्यांपेक्षा जास्त व इतर ९ जिल्ह्यांत १५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अशा जिल्ह्यांतील वाहतूक व्यवस्था व जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. यामुळे सद्यः परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडणे शक्य होणार नाही. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.